पिंपरी पेंढारला फुलली सफरचंदाची बाग | पुढारी

पिंपरी पेंढारला फुलली सफरचंदाची बाग

ओतूर(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी पेंढार येथील पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दोन भावांनी शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करून अर्धा एकर क्षेत्रात सफरचंदाची लागवड यशस्वी केली आहे. सध्या या झाडांना मोठ्या प्रमाणात सफरचंद लगडली असून, बागेत फेरफटका मारला असता काश्मीरमध्ये असल्याचा अनुभव येत आहे.

अशोक नामदेव जाधव हे पारंपरिक शेतीत पंचवीस वर्षांहून अधिक वर्षे द्राक्ष उत्पादन घेतात. शेतमालाला मिळणार्‍या अनिश्चित दरामुळे त्यांची दोन्ही मुले प्रणय व तुषार यांनी नोकरी व व्यवसायाच्या मागे न लागता शेतातच नावीन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला, त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाइकांकडे सफरचंदाची झाडे बघितली आणि आपल्याही शेतात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला.

अर्धा एकरात हरमन 99 या जातीच्या 150 झाडांची लागवड डिसेंबर 2019 मध्ये केली, त्यासाठी त्यांनी काश्मीरहून रोपे मागविली. शेणखत, रासायनिक खतांचा वापर केला. आज या बागेत सफरचंद लगडलेले दिसतात, ही सफरचंद महिनाभरात बाजारात विक्रीस येणार असल्याचे प्रणय आणि तुषार यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी होऊन चांगला नफा पदरात पडल्यास आणखी मोठ्या प्रमाणात साफरचंदाचे उत्पादन करण्याचा मानस तुषार आणि प्रणय या भावंडांनी दै.’पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

Back to top button