पुणे : आरटीई प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस | पुढारी

पुणे : आरटीई प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणार्‍या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेण्यासाठी पालकांना 8 मे ही मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्रवेशाचा आज शेवटचा दिवस आहे. परंतु, आतापर्यंत केवळ 48 हजार 12 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही 53 हजार 834 जागा रिक्तच असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेण्यासाठी पालकांना मुदतवाढ मिळेल का? अशी विचारणा राज्यातील पालकांकडून होत आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये प्रवेशासाठी 1 लाख 1 हजार 846 जागा उपलब्ध आहेत.

या जागांवर प्रवेशासाठी 3 लाख 64 हजार 413 पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार प्रवेशाच्या निवड यादीसाठी पहिली लॉटरी काढण्यात आली असून, त्यामध्ये 94 हजार 700 मुलांना प्रवेश जाहीर झाले आहेत. या मुलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, कागदपत्रे पडताळणी समितीकडून ऐनवेळी विविध कागदपत्रांची मागणी आणि इंग्रजी शाळांकडून प्रवेश न देण्याची भूमिका, यामुळे प्रवेश प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश

आरटीई प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात 935 शाळांमध्ये प्रवेशाच्या 15 हजार 596 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 77, 531 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी 15 हजार 501 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला आहे. यापैकी 8 हजार 49 विद्यार्थ्यांचे प्रवेश शाळांमध्ये निश्चित झाले.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.

Back to top button