पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा; वाल्हेच्या वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई | पुढारी

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा; वाल्हेच्या वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्याच्या काही भागांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. वाल्हे (ता.पुरंदर) गावाच्या पूर्वेकडील वाड्या- वस्त्यांवरील जलस्रोतांची पातळी खालावल्याने येथील नागरिकांकडून टँकरची मागणी होत आहे. मागील वर्षी वाल्हे व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही असे वाटत होते. परंतु, वातावरणातील बदलाने वाल्हे येथील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गायकवाडवाडी परिसरात टँकर त्वरित सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. परंतु, वाल्हे परिसरात अद्याप पाऊस झालेला नाही. मागील आठवड्यापासून दररोज दुपारनंतर आकाशात ढग दाटून येत आहेत. परंतु, पाऊस पडत नाही. वाढत्या उष्णतेने विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. असेच वातावरण राहिले तर पाणीटंचाईची तीव—ता वाढण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वाल्हे गावच्या पूर्वेकडील वाड्या-वस्त्यांवर मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली असून, या परिसरात टँकर त्वरित सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्याकडेही या परिसरात टँकर त्वरित सुरू करण्या संदर्भातील पत्र देण्यात आले आहे.

                                            – अमोल खवले, सरपंच, वाल्हे

Back to top button