खोर : टंचाईवर मात करण्यासाठी बंधारे | पुढारी

खोर : टंचाईवर मात करण्यासाठी बंधारे

खोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याचा दक्षिण पट्टा उन्हाळ्याच्या कालावधीत नेहमीच पाणीटंचाईच्या झळा सोसत असतो. पावसाचे पाणी न अडविल्याने खोर, देऊळगावगाडा, नारायण बेट, माळवाडी या भागात पाणीटंचाईची समस्या सातत्याने जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी देऊळगावगाडा येथे बंधार्‍यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, जलसंपदा विभागाच्या वतीने पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी देऊळगावगाडा येथील ओढ्यावर 4 बंधारे बांधण्यात येत आहेत. यासाठी 1 कोटी 42 लाख 83 हजार 481 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देऊळगावगाडा ग्रामपंचायतचे सदस्य अक्षय बारवकर यांनी दिली. श्रीकांत काटे यांच्या शेताजवळील ओढामधील बंधार्‍याचे काम पूर्ण झाले असून, रासकरवस्ती येथील काम सध्या सुरू आहे. त्यानंतर मोरेवस्ती व श्री सद्गुरू माध्यमिक विद्यालय शेजारील ओढ्यावर बंधारा बांधला जाणार आहे.

या कामासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार रमेश थोरात यांचे सहकार्य लाभले, असे अक्षय बारवकर यांनी सांगितले. या कामाची पाहणी सरपंच कल्पना शितोळे, अक्षय बारवकर, माजी उपसरपंच गणेश जाधव, प्रकाश टुले, भाऊसाहेब शितोळे, सोमनाथ बारवकर, माउली वाघापुरे, कृषी अधिकारी दिलीप यादव, ग्रामसेविका प्रज्ञा चव्हाण, सागर बारवकर उपस्थित होते.

Back to top button