‘आयटीयन्स’च्या नशिबी कोंडीच | पुढारी

‘आयटीयन्स’च्या नशिबी कोंडीच

संतोष शिंदे : 

पिंपरी : शहराने तीन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचा मोठा फटका अनुभवला. या पावसामध्ये हिंजवडी-वाकड परिसरातील वाहतुकीचे नियोजन अक्षरशः विस्कटून गेले होते. आयटीयन्ससह स्थानिक नागरिक तब्बल तीन तास वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. एरवीदेखील काही ठिकाणी आयटी कर्मचार्‍यांना अडकून पडावे लागते. यातच पाऊस अन् पोलिसांनी मार्गात केलेल्या बदलांची भर पडली. त्यामुळे आयटीयन्सच्या नशिबी वाहतूक कोंडीच असल्याचे बोलले जात आहे.

जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या हिंजवडी आयटी हबमध्ये अतिक्रमण आणि मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. सन 2018 मध्ये सर्वप्रथम तत्कालीन पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हिंजवडी परिसरातील मार्गांचा अभ्यास करून त्यांनी चक्राकार वाहतूक सुरू केली. त्यांच्या या प्रयत्नांना काही अंशी यशही आले. मात्र, तरीही हिंजवडीची वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटली नाही.

आयटी हबचा गुदमरलेला श्वास मोकळा करायचा असेल तर, आणखी पर्यायी रस्ते खुले करण्याची नितांत गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त बिष्णोई यांनी हिंजवडीतील कोंडी फोडण्यासाठी वाहतुकीचा ताण असणारे चौक आणि कोंडी होणारे मार्ग यांचा जागेवर प्रत्यक्ष जाऊन आढावा घेत काही उपाययोजना राबवल्या. मात्र, तरीही हिंजवडीने मोकळा श्वास कधी घेतलाच नाही.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर भूमकरनगर, कस्तुरी चौक, विनोदेनगर या मार्गात एकेरी वाहतूक सुरू केली आहे. वाहतुकीत झालेला बदल समजून घेत असतानाच गुरुवारी सायंकाळी अवकाळीचा फटका बसला. त्यामुळे रस्त्यात जागोजागी पाण्याची डबकी साठली. भूमकर चौकातील उड्डाणपूल, हॉटेल टिपटॉप, सयाजी अंडरपास अक्षरश: पावसाच्या पाण्याने भरला होता. त्यामुळे वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला. सोशल मीडियावर कोंडीचे फोटो व्हायरल झाल्याने हिंजवडीची वाहतूक कोंडी राज्यात चर्चेचा विषय ठरली.

सार्वजनिक वाहतुकीला चालना द्यायला हवी
किमान दोन प्रवासी असल्यास कार वापरावी.
प्रशासनाने रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याची गरज
हिंजवडीत ठराविक अंतरावर एक टो-व्हॅन असावी
पोलिसांचा नागरिकांशी सुसंवाद वाढवण्याची गरज
हिंजवडीकडे येणार्‍या सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे गरजेचे
रस्त्यावरील बस थांबे मागे घ्यावेत
आवश्यक त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग करावे
हिंजवडीतील डी मार्ट, वाईन शॉप समोर वाहनांना थांबू देऊ नये

भूमकर चौक कोंडीचे कारण
भूमकर चौक येथील भुयारी मार्ग वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत आहे. रुंद झालेल्या रस्त्यांवरून हिंजवडीकडे जात असताना भूमकर चौकात रस्ता अरुंद होत आहे. तसेच, भुयारी मार्गात पावसात गुडघाभर पाणी साठते. त्यामुळे दरवर्षी वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. यावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही.

हिंजवडी परिसराचे मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हिंजवडीतील वाहतूक वाकड हद्दीतून भूमकर चौक मार्गे वाळवावी लागणार आहे. ऐनवेळी वाहतुकीचा ताण येऊ नये, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
                      – डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

एकेरी वाहतुकीमुळे वाहतुकीचा कोंडीचा सामना करावा लागत आहे. कार्यालयात पोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यात विनाकारण वेळ जात आहे. एकेरी वाहतुकीचा निर्णय घेताना आयटी कंपन्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता.
                                                          – अमित तलाठी, आयटीयन्स

हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न स्वागतार्ह आहेत; मात्र असे बदल करण्यापूर्वी स्थानिकांना कल्पना देणे गरजेचे आहे. शंभर मीटर अंतरावर असलेल्या घरी जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर वळसा मारून जावे लागत आहे.
                                                           – भारती विनोदे, भाजप पदाधिकारी

Back to top button