बेल्हे : भरउन्हात उभे राहून कर्तव्य पार पाडतात!

बेल्हे : भरउन्हात उभे राहून कर्तव्य पार पाडतात!

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : मे महिन्यात पार्‍याने 41 अंश सेल्सिअसची पातळी गाठली आहे. चौकात थांबून वाहतुकीचे नियमन करणार्‍या पोलिसांना सध्या उन्हाचा चांगलाच चटका बसत आहे. मात्र, तरीही भर उन्हात उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, बेशिस्त वाहनचालकांना दंड करून धडा शिकवण्याचे काम वाहतूक पोलिस करत आहेत.

नागरिकांमधून नेहमीच वाहतूक पोलिसांवर टीका होते. मात्र, या पोलिसांना नागरिकांच्या सुविधेसाठी उन्हामध्ये उभे राहूनच वाहतुकीचे नियमन करावे लागते. सध्या सकाळी नऊपासूनच उन्हाचा तडाखा जाणवतो. उन्हाच्या त्रासामुळे नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळतात. मात्र, वाहतूक पोलिस उन्हाची पर्वा न करता काम करत राहतात. आळेफाटा चौकात वाहतूक पोलिसांना उभे राहण्यासाठी सावलीही नाही. पोलिस मदत केंद्रात काही वेळ विश्रांती घेतात, अन् पुन्हा कामासाठी उभे राहतात.

उन्हात उभे राहून कर्तव्य बजावताना वाहतूक पोलिसांना भोवळ येण्याचे प्रकारही घडत आहेत. पोलिसांना उन्हाळी टोप्या दिल्या असल्या तरीही केवळ टोपी घालून भर उन्हात चौकात थांबल्याने उन्हाच्या झळा कमी होत नाहीत. काही चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना इमारतीच्या कडेला सावलीखाली थांबता येते. मात्र, पुणे-नाशिक महामार्ग व मुंबई विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालताना पोलिसांना उन्हापासून संरक्षणाची कोणतीही उपाययोजना नाही, असे वाहतूक पोलिस नाईक ए. एस. फलके यांनी सांगितले.

उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. शक्यतो सावलीत थांबून वाहतूक नियमन करावे.

                                     – यशवंत नलावडे, पोलिस निरीक्षक.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news