पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांची गुप्तचर यंत्रणेकडून (रिसर्च अँड अॅनलसिस विंग- रॉ) चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यावर शत्रुराष्ट्र पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी हेरांना कुरुलकर परदेशात भेटले होते का, त्यांनी हेरांना नेमकी काय माहिती दिली, तसेच ते पाकिस्तानी हनी ट्रॅप कसे अडकले, याची माहिती 'रॉ'च्या अधिकार्यांकडून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कुरुलकर सप्टेंबर 2022 पासून े पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांच्या संपर्कात होते. गुप्तचर यंत्रणेने कुरुलकर यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. त्यांच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्या वेळी डीआरडीओच्या एका समितीकडे चौकशीसाठी हे प्रकरण सोपविण्यात आले होते.
चौकशीत कुरुलकर दोषी आढळल्यानंतर त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला लॅपटॉप आणि मोबाईल राज्य दहशतवादविरोधी पथकातील अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे सोपविण्यात आला होता. कुरुलकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले तसेच ते कोणाच्या संपर्कात होते. त्यांनी पाकिस्तानी हेरांना नेमकी काय माहिती दिली, याबाबतची माहिती 'रॉ'च्या अधिकार्यांकडून घेण्यात आली. कुरुलकर यांनी पाकिस्तानी हेरांना संवदेनशील माहिती दिल्याचा संशय आहे.
जाळ्यात अडकल्यानंतर कुुरुलकरांनी परदेशात भेटी पाकिस्तानी हेरांच्या भेटी कशा आणि केव्हा घेतल्या, या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. कुरुलकर यांनी कार्यालयीन गोपनीय माहिती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करून पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) गुप्तचर यंत्रणेला दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यांनी शासकीय गोपनीय माहिती आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानला दिल्याचाही संशय आहे.
कुरुलकर देशातील अन्य राज्यांतील काही जणांच्या संपर्कात असल्याची मिळाली आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेरांशी संपर्क साधताना कोणत्या उपकरणांचा वापर करत होते, या दृष्टीने तपास करण्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) तपास करण्यात येत आहे. याबाबत डीआरडीओच्या दिल्ली मुख्यालयातील अधिकार्यांनी मुंबईतील एटीएसच्या काळाचौकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम 1923 च्या कलमान्वये दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना 9 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश आहेत.