बॅकफूटवर गेलेली एसटी सध्या सुसाट ! उन्हाळी सुट्यांमुळे बसगाड्या फुल्ल | पुढारी

बॅकफूटवर गेलेली एसटी सध्या सुसाट ! उन्हाळी सुट्यांमुळे बसगाड्या फुल्ल

बारामती; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्या आणि यात्रा-जत्रांचा अंतिम टप्प्यातील हंगाम यामुळे एसटी बसगाड्या सध्या फुल्ल भरून धावत आहेत. कोरोना काळात बॅकफुटवर गेलेली एसटी सध्या सुसाट सुटली आहे. त्यात ‘महिला सन्मान योजने’मुळे महिलावर्ग एसटीच्या प्रवासाला पसंती देत असल्याने एसटीच्या उत्पन्नात भर पडत आहे.

शाळा आणि महाविद्यालयांना एक मेपासून सुट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे नातेवाईकांकडे, सुटीसाठी एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एसटीला पसंती दिली जात आहे. बारामती तालुक्यातील यात्रा-जत्रांचा हंगाम संपला असून, यात्रेनिमित्त गावाकडे आलेले लोक आता परतू लागले आहेत. ते एसटीलाच अधिक पसंती देत आहेत. राज्य सरकारने महिलांसाठी सन्मान योजना जाहीर केली. त्याचा फायदा एसटीला होताना दिसतो आहे. अर्ध्या तिकिटामुळे महिलावर्गाची मोठी आर्थिक बचत होत असल्याने त्या एसटी प्रवासाला पसंती देत आहेत.

बारामती बसस्थानकावर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शहरातील नूतन बसस्थानकाच्या इमारतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात शहरातील कसबा भागात राष्ट्रवादी भवनाशेजारील जागेत हलविण्यात आले आहे.

शहरात नव्याने आकाराला येत असलेले बसस्थानक राज्यात सर्वांत सुंदर असले, तरी सध्याच्या परिस्थितीत कसब्यातील तात्पुरत्या स्थानकात प्रवाशांसह चालक-वाहकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात महिला वाहकांची तर मोठी कुचंबणा होत आहे. पुण्याला जाण्यासाठी विनावाहक-विनाथांबाचे तिकीट मिळवितानाही उन्हात थांबावे लागत आहे. एकीकडे एसटी प्रवासाला गर्दी वाढत असताना दुसरीकडे यंदा बारामतीत प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शौचालयाअभावी वाहक-चालकांची गैरसोय

सध्या उन्हाळ्याचे दिवस असताना येथे पुरेशी व्यवस्था नाही. शौचालयांची व्यवस्था अत्यंत दयनीय असून, वाहक-चालकांना त्यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

Back to top button