

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : निरा देवघर धरणातील पाणीसाठा 36 टक्के, तर भाटघर धरणात 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भाटघर धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाल्याने विसर्ग बंद करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक व पालखी सोहळ्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या विसर्गामुळे भाटघर धरणात केवळ 20 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा निम्म्याने कमी आहे. गेल्यावर्षी 6 मे रोजी धरणात 44 टक्के पाणीसाठा होता. निरा देवघर धरणात मात्र गेल्यावर्षी एवढाच 36 टक्के पाणीसाठा आहे.
यावर्षी भाटघर धरणातून 1 जानेवारीपासून विसर्ग सोडण्यात आला. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 1 हजार 876 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. निरा- देवघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 786 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दोन्ही धरणांच्या साखळीतील वीर धरणात 45.58 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरी पावसात घट होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट अखेर पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवा समितीच्या बैठकीत केले होते. त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. पावसाचा अंदाज गृहीत धरून धरणातील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात
आला आहे.
पाण्याचा वापर काटकसरीने करा
भाटघरमधील पाणीसाठा कमी झाल्याचा परिणाम अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांवर होणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.