पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि लक्झरी बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि लक्झरी बसचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

कुरकुंभ(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ हद्दीत मालट्रकला लक्झरी बसने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोनजण ठार झाले असून तीनजण जखमी झाले आहे. ६ मे ला हि घटना घडली. याप्रकरणी बसचालकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूनाथ चन्नाप्पा कलबंडे (वय ५२, सध्या रा. शाहु काँलनी वेदांन्त नगरी गल्ली नं ११, कर्वेनगर पुणे -५२, मुळ रा. बडधळ, ता. अफजलपुर, जि गुलबर्गा, रा. कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ५) फिर्यादी आणि त्यांची पत्नी देवदर्शनासाठी मल्लिकनाथमठ भिगवण (ता. इंदापुर) येथे गेले होते. शनिवारी (दि.६) देवदर्शन उरकून पुन्हा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून खाजगी लक्झरी बसने (युपी ७८ एफएन ९२५७) पुण्याला घरी जाण्यासाठी निघाले होते. कुरकुंभ गावचे हद्दीत बसचालकाने भरधाव वेगात बस चालवुन समोरील अज्ञात मालट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात शोभा गुरूनाथ कलबंडे आणि महादेव सोपान भिसे (वय ४५ रा. रामनगर चिचवड पुणे) यांचा मृत्यू झाला. राजश्री कल्याणराव मोरे (वय ३९, रा. उमरगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, सध्या रा. चिंचवडनगर चिंचवड, जि. पुणे), आकाश दत्तात्रय पोकरकर (वय २७, रा. कवठे यमाई, ता. शिरूर), अनिल गुडप्पा बडेकर (वय २५, रा. सुतारवाडी रोड, भवानीनगर पाषाण पुणे) यासह इतरांना किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या आहेत. बसचालक सलीम महेबुब सडकवाला (रा. कासार शिरसी, ता. निलंगा, जि लातुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button