पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम पुन्हा सुरू | पुढारी

पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम पुन्हा सुरू

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-मिरज-कोल्हापूर या लोहमार्गाच्या विस्तारीकरणाचे काम पुरंदर तालुक्यात सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी या मार्गावर भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन ते काम बंद पाडले होते; मात्र, ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करून रेल्वे प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या सोयीनुसार मार्ग तयार करण्यास शनिवारी (दि. 6) सुरुवात करण्यात केली. यावरून शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यापुढे रेल्वे प्रशासनास झुकावे लागले आहे.

बहिजींचीवाडी परिसरामधील मूळ रस्त्यावर मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाचे काम सुरू केले आहे; मात्र, हा भुयारी मार्ग रेल्वेने येथील पूर्वीच्या रस्त्यावरच सुरू केल्याने तो वेडावाकडा आणि धोका निर्माण करणारा होणार होता. तसेच, या भुयारी मार्गामध्ये पाणी साठल्यास लोकांच्या ये-जा करण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, असा आक्षेप स्थानिकांनी नोंदविला होता. वागदरवाडी-बहिर्जीचीवाडी, पवारवाडी, मोरूजीचीवाडी, बाळाजीचीवाडी आदी वाड्यावस्त्यांवर जाण्यासाठी तयार होत असलेल्या भुयारी मार्गाचे काम शुक्रवारी (दि. 5) परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन बंद पाडले होते.

दरम्यान, या वेळी कामाच्या पाहणीसाठी आलेले रेल्वे प्रशासनाचे विजयकुमार सक्सेना यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देता न आल्याने हे काम बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. रेखा पवार, उद्योजक सुनील पवार, पोपट पवार, राजसिंह पवार, अरविंद पवार, विजय पवार, तात्यासाहेब पवार, बाळासाहेब पवार, नारायण पवार, शिवाजी पवार, कैलास पवार, महेंद्र पवार आदींसह ग्रामस्थ याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांची एकजूट ठरली महत्त्वाची

पुणे-मिरज लोहमार्गावर अनेक ठिकाणी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग केले आहेत. इतर ठिकाणी थोडा का होईना रस्ता सरळ असू शकतो; तर आमच्या येथे का नाही, असा प्रश्न उपस्थित करत शासन जनतेच्या पैशावर ही कामे राबवीत असते. त्यामुळे जनतेच्या पैशातून होणारी कामे जनतेला हवी तशीच व्हायला हवी, असा आग्रह ग्रामस्थांनी एकजुटीने धरला होता. या एकजुटीपुढे रेल्वे प्रशासनास झुकावे लागल्याने, शेतक-यांसह, ग्रामस्थ, प्रवाशी वर्गाचा या मार्गातून पुढील प्रवास सुकर होणार आहे.

Back to top button