पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता एमएचटी सीईटी 2023 ही सामाईक प्रवेश परीक्षा पीसीएम ग्रुप दिनांक 9 ते 14 मे व पीसीबी ग्रुप 16 ते 21 मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. पीसीएम ग्रुपचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर पीसीबी ग्रुपचे प्रवेशपत्र येत्या 10 मेपासून उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती सीईटीसेतर्फे देण्यात आली आहे.
एमएचटी सीईटी 2023 (पीसीएम ग्रुप) चे प्रवेशपत्र उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेले असून, उमेदवारांनी प्रवेशपत्र अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट काढावी. प्रवेशपत्रावरील परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता इत्यादी काळजीपूर्वक वाचावे.
परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्राचे मुख्य द्वार बंद होण्यापूर्वी पोहोचण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. परीक्षेस जाताना प्रवेशपत्र सोबत घेऊन जावे. परीक्षेस जाताना उमेदवाराने आपल्याबरोबर आपली ओळख दर्शविणारी प्रवेशपत्रामध्ये नमूद ओळखपत्रे जसे की, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट सोबत ठेवावीत. दिव्यांग उमेदवारांनी अपंगत्वाबातचे मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.