कोकणात जाणार्‍या गाड्या फुल्ल; अतिरिक्त गाड्यांचे नियोजन | पुढारी

कोकणात जाणार्‍या गाड्या फुल्ल; अतिरिक्त गाड्यांचे नियोजन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्या पडल्यामुळे शहरात राहणारे अनेक चाकरमानी आपापल्या गावी जाण्यासाठी निघालेले आहेत, त्यामुळे एसटीच्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाली आहे. यात मुख्यत्वे करून पुण्यातून कोकण भागात जाणार्‍या गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. एसटी प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळी सुट्यांसाठी अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात.

या अतिरिक्त गाड्यादेखील सध्या भरून जात आहेत. शासनाने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना निम्म्या तिकिटात प्रवास, या दोन योजना एसटीच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. या योजनांच्या परिणामामुळे एसटीच्या सर्वच ठिकाणी जाणार्‍या गाड्यांना गर्दी होत आहे. यात सध्या कोकण भागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात जाणार्‍या आणि तेथून येणार्‍या गाड्या फुल झाल्या आहेत. त्यांची आरक्षणेदेखील फुल्ल झाली असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

पुण्यातून या भागात धावतात गाड्या…

एसटीच्या पुणे विभागातील पुणे स्टेशन आणि पिंपरी-चिंचवड आगारातून गाड्या कोकण भागात सोडल्या जातात. या गाड्या कोकण भागात चिपळूण, आहेरवाडी, विनेरा, गणपतीपुळे, माखजन, दापोली, वेळाज, तिवरे येथे धावतात. त्या गाड्या सर्वच्या सर्व फुल होत आहेत.

इतर भागांतूनही कोकणात प्रवाशांची गर्दी…

एसटीच्या सिंधुदुर्ग विभागातून 20 ते 25 गाड्या दिवसभरात सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली या भागांत, तर रत्नागिरी विभागाच्या सुमारे 40 गाड्या चिपळूण, गुहागर, दापोली, खेड, मंडणगड, राजापूर येथे जातात. रायगड विभागाच्या सुमारे 20 गाड्या श्रीवर्धन, माणगाव, महाड, पोलादपूर या भागात जातात. या सर्व गाड्यांना प्रवाशांची गर्दी आहे.

उन्हाळी सुट्यांमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. यात मुख्यत्वे कोकण भागात जाणार्‍या गाड्या भरून जात आहेत. आगाऊ आरक्षणेदेखील फुल झाली असून, आम्ही अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत.

             – कैलास पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

Back to top button