पुणे : आता पाणीपुरवठ्याचे नियोजन करणार ठेकेदार | पुढारी

पुणे : आता पाणीपुरवठ्याचे नियोजन करणार ठेकेदार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेकडून शहरात पाणी वितरणासाठी 140 झोन तयार करण्यात आले आहेत. यातील 34 झोनचे काम पूर्ण झाले असून, त्यातील 10 झोनमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन ठेकेदारांमार्फत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयावर टीका होत आहे. शहरातील नागरिकांना समान पाणी मिळण्यासाठी आणि पाणी गळती थांबविण्यासाठी पालिकेकडून 2,515 कोटी रुपये खर्चाची समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे.

हे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या योजनेंतर्गत शहरात 83 पाण्याच्या टाक्या, 1650 किलोमीटरच्या जलवाहिन्या, आणि 3 लाख 18 हजार पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने 141 झोन केले आहेत. या झोनपैकी 34 झोनचे काम पूर्ण झाले आहे.

काम पूर्ण झालेल्या झोनच्या देखभाल-दुरुस्तीचे आणि पाणी सोडण्याचे नियोजन करण्याचे काम ठेकेदारांना देण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. या ठेकेदारांवर स्काडा शहरातयंत्रणेच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार असून नियोजित वेळेत ठरवून दिलेले पाणी सोडणे, पाण्याचा दाब नियंत्रित ठेवणे याची जबाबदारी ठेकेदारांवरच राहणार आहे. मात्र, हे होत असताना अद्याप पालिकेची स्काडा यंत्रणा तयार झालेली नसल्याने या ठेकेदारांवर नियंत्रण कोण ठेवणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Back to top button