पुणे : पाणीगळती शोधण्यासाठी प्रति कि. मी. 1 लाख खर्च

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाण्याची गळती शोधण्यासाठी महापालिका आता प्रती किलोमीटर एक लाख रुपये खर्च करणार आहे. सुरुवातीला मुख्य जलवाहिन्यांची गळती शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामध्ये जलवाहिनीत हेलियम वायू सोडणे आणि साऊंड सेन्सरचा समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने वडगाव जलकेंद्रापासून कात्रज येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीपर्यंतच्या मुख्य वाहिनीवर 13 ठिकाणी गळती असल्याचे निदर्शनास आले.
त्यानुसार गळती रोखण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले. आता या दोन्ही तंत्रज्ञानाचा उपयोग मुख्य जलवाहिनीतील पाण्याची गळती शोधण्यासाठी केला जाणार आहे. पाणी सोडण्यासाठी व्हॉल्व्ह सोडणे आणि ते बंद करण्याचे काम स्वयंचलित करण्यात येणार आहे. यासाठी दहा ते पंधरा व्हॉल्व्ह प्रायोगिक तत्त्वावर स्वयंचलित पद्धतीने कार्यान्वित केले जातील. यामुळे मनुष्यबळाची बचत करणे शक्य होणार आहे, अशीही माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.