पुणे : प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्‍यांना विरोध ! | पुढारी

पुणे : प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्‍यांना विरोध !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षण विभागातील कामकाजाची घडी बसविण्यासाठी शिक्षण विभागातील संचालक, सहसंचालक, विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदावर महसूल आणि ग्रामविकास विभागसह अन्य विभागांतील अधिकार्‍यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. परंतु याला अखिल महाराष्ट्र शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी संघाने विरोध करत शिक्षण विभागातीलच अधिकार्‍यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.

शालेय शिक्षण विभागातील संचालक, सहसंचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष या पदाचा अतिरिक्त भार उपलब्ध असलेल्या अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला होता. मात्र, मूळ विभाग व अतिरिक्त कार्यभाराचा विभाग अशा दोन्ही विभागांचे कामकाज करताना अधिकार्‍यांचीच डोकेदुखी वाढली होती.

यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षण विभागातील रिक्त पदांवर मंत्रालयातील विभागातील सहसचिव, उपसचिव व महसूल संवर्गातील अधिकार्‍यांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्याचा निर्णय फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार 19 रिक्त जागांसाठी इच्छुक अधिकार्‍यांकडून अर्जही मागविण्यात आले होते.

यातून महसूलच्या 5, ग्रामविकासमधील 3, मंत्रालयीन आस्थापनेवरील 2, राज्य नियोजन मंडळातील 1 याप्रमाणे अधिकार्‍यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. परंतु राजपत्रित अधिकारी संघाने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण संचालकांची पदे प्रतिनियुक्तीने भरण्याची तरतूद नाही. त्यामुळे रिक्त पदे शिक्षण विभागातील सहसंचालक व उपसंचालक संवर्गातील सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन भरण्यात यावी. तसेच त्यानंतर निर्माण होणारी उपसंचालक व तत्सम संवर्गातील पदे कनिष्ठ संवर्गातील सेवा ज्येष्ठता अधिकारी यांच्यातून भरण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी संघाने केली आहे. तसेच मागणीसाठी न्याय्य मार्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या अधिकार्‍यांची प्रतिनियुक्ती

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकपदी सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव सं. द. सूर्यवंशी यांची, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांची तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीने वर्णी लागली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्तपदी भंडारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालकपदी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, प्राथमिक शिक्षण संचालनालयातील सहसंचालकपदी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त संतोष हराळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील सहसंचालकपदी गडचिरोली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर आदी अधिकार्‍यांची एक वर्षासाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

Back to top button