बारामती (पुणे), पुढारी वृत्तसेवा: राजीनामा मागे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारामतीच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कर्मभूमीत जोरदार स्वागत करण्यात आले. गोविंदबाग निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयाने शहरात पक्ष पदाधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारी (दि. ५) पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर बारामतीकर सुखावले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. निर्णय मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पवार कर्मभूमीत परतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांचे जोरदार स्वागत केले.
पवार येणार असल्याची माहिती सर्वांना सकाळीच समजली होती. त्यामुळे सकाळपासूनच गोविंदबागेच्या प्रवेशद्वारावर लोकांनी एकच गर्दी केली होती. पवार यांचे आगमन होताच सर्वांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. 'देश का नेता कैसा हो, पवारसाहेब जैसा हो', 'पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', या घोषणांनी परिसर दणाणला. पवार यांच्या आगमनाने पूर्ण परीसर 'पवारसाहेब'मय झाल्याचे चित्र होते.
जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, उद्योजक रवींद्र काळे यांनी शाल आणि खास पवार यांच्यासाठी बनविलेला गुलाबांचा पुष्पहार घालून जोरदार स्वागत केले. माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.