वारुळवाडी हद्दीतील रस्त्यावर कचर्‍याचे ढीग | पुढारी

वारुळवाडी हद्दीतील रस्त्यावर कचर्‍याचे ढीग

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : वारुळवाडी ग्रामपंचायतीद्वारे कचरा गोळा करण्यासाठी रोज घंटागाडी फिरत असतानादेखील अनेक नागरिक रस्त्यावर व इतरत्र कचरा टाकत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी सुटत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाप्रकारे रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांवर ग्रामपंचायतीद्वारे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

झपाट्याने विस्तारित होणारे गाव म्हणून वारुळवाडी ओळखले जाते. वारुळवाडी येथे अंगणवाडी, प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यमातील शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात इमारतींची कामे होऊन वसाहती निर्माण झाल्याने नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. वारुळवाडी हद्दीतील कॉलेज रोड हा महत्त्वाचा असून, याच रस्त्यादरम्यान अनेक दुकाने, वसाहती आहेत. सकाळी व सायंकाळच्या वेळेस अनेक लोक चालायला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात.

वारुळवाडी ग्रामपंचायतीने क्षेत्रातील वाढती लोकसंख्या व वसाहती पाहता येथील ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीचे नियोजन केले असून, ग्रामपंचायतद्वारे 3 घंटागाड्या व 1 ट्रॅक्टर दररोज कचरा गोळा करण्याचे काम करीत आहे. यासाठी 7 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. रोज दुपारपर्यंत कचरा गोळा करण्याचे काम चालत असतानादेखील या भागात राहणारे काही नागरिक घंटागाडीत कचरा टाकण्याचा कंटाळा करून इतर वेळेत रस्त्यावर कचरा टाकत असल्यामुळे भटकी कुत्री अन्न शोधताना कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्या फोडत असल्याने रस्त्यावर घाण पसरत आहे.

दरम्यान कॉलेज रोडला महावितरण कंपनीच्या वसाहतीमागे असणार्‍या ओढ्यात आजूबाजूच्या वसाहतीत राहणार्‍या लोकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने इथे कचर्‍याचे ढीग निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या कचर्‍यामुळे पाणी निघून जाण्यास अडचण निर्माण होऊन ओढ्याचा नैसर्गिक स्त्रोत तुंबण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीने रस्त्यावर कचरा टाकणार्‍या नागरिकांवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

कचरा गोळा करणार्‍या घंटागाडीद्वारे नागरिकांसाठी याबाबत सूचना देण्यात येत असून, कोणीही व्यक्ती कचरा टाकताना आढळून आल्यास त्याचा व्हिडिओ किंवा फोटो ग्रामपंचायतीला दिल्यास त्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवून त्याला बक्षीस देण्यात येणार आहे. कचरा टाकणार्‍या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात काही ठिकाणी लवकरच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

                                                                – राजेंद्र मेहेर,
                                                           सरपंच, वारुळवाडी

Back to top button