पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी ‘तारीख पे तारीख’; शेतकरी हवालदिल | पुढारी

पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी ‘तारीख पे तारीख’; शेतकरी हवालदिल

दिवे; पुढारी वृत्तसेवा : दिवे परिसरातील शेतकरी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याची वारंवार मागणी करूनही त्यांना पाणी मिळत नाही. यासाठी अधिकारी ‘तारीख पे तारीख’ जाहीर करत आहेत. आम्ही या सिंचन योजनेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत म्हणून आमचा या पाण्यावर हक्क नाही का? असा संतप्त सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी दिवे परिसरातील या पाण्याबाबत दै. ‘पुढारी’ने शेतकर्‍यांच्या तीव्र भावना मांडल्या होत्या. त्यामुळे मधल्या काळात या परिसरात पुरंदर उपसाचे पाणी कसेबसे पोहोचले. या पाण्यावर काही शेतकर्‍यांनी चारापिके, भाजीपाला व काही नगदी पिके घेतली, तर काही शेतकर्‍यांनी सीताफळ बहाराचे नियोजन केले; मात्र, सध्या या पाण्याने तळ गाठला आहे. ज्या शेतकर्‍यांकडे पाणी साठवण्यासाठी शेततळी आहेत असे शेतकरी शेततळ्यातून पिकांना पाणी देत आहेत; मात्र ज्यांच्याकडे पाणी साठवण्यासाठी शेततळी नाहीत त्यांना फक्त विहिरीवर अवलंबून राहावे लागते, अशा शेतकर्‍यांसमोर पिके वाचविण्याची वेळ आली आहे.

शासकीय अनास्था कारणीभूत

दिवे परिसरातील शेतकरी स्वत: वाघापूर पंप हाऊसपर्यंत गेले असता शिंदवणे घाटातील पंप हाऊस क्रमांक चार येथे चार पंपांपैकी केवळ एकच पंप सुरू असल्याचे दिसून आले. मंगळवारी तो पंपदेखील बंद पडला होता. परंतु कामगारांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत तो कसाबसा सुरू केला. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर योजना सुरू झाली.

खरंतर एखादा पंप बंद पडला की त्या पंपाचा खराब झालेला भाग न बदलता दुसर्‍या नादुरुस्त पंपाचा तो सुटा भाग काढून त्या पंपाला बसवायचा व तो पंप सुरू करायचा अशा पद्धतीने काम सुरू आहे. साधारण जूननंतर किमान आठ महिने ही योजना बंद राहणार आहे. या कालावधीत संपूर्ण योजनेची 100 टक्के दुरुस्तीची कामे करावीत, जेणेकरून पुढील हंगामात ही योजना पूर्ण क्षमतेने चालेल, अशी माफक अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button