पवारांनी एका रात्रीत फिरवली सूत्रे ; मणिपूरच्या दंगलीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मिळाले संरक्षण | पुढारी

पवारांनी एका रात्रीत फिरवली सूत्रे ; मणिपूरच्या दंगलीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मिळाले संरक्षण

बारामती; पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमध्ये दोन समाजांच्या दंगलीत सापडलेल्या जत (जि. सांगली) येथील एक विद्यार्थी व त्याच्या अन्य सहकार्‍यांच्या मदतीसाठी एका रात्रीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूत्रे फिरविली. त्यानंतर मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना मिलिटरीने संरक्षण पुरवत सुरक्षितस्थळी हलविले. या विद्यार्थ्याच्या पालकांनी बारामतीच्या एका शेतकर्‍याकडे मदत मागितली होती. त्यांनी पवार यांच्या कार्यालयापर्यंत हा निरोप दिल्यावर लागलीच कार्यवाही होत मदत मिळाली.

मळद (ता. बारामती) येथील शेतकरी आणि ऑरगॅनिक अँड रेस्युड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनचे (मोर्फा) सचिव प्रल्हाद वरे यांना गुरुवारी (दि. 4) सायंकाळी मोर्फाचे सभासद संभाजी कोडग (रा. आवंडी, ता. जत, जि. सांगली) यांचा फोन आला. त्यांनी त्यांचा मुलगा ‘आयआयआयटी’ इम्फाळ येथे शिक्षणासाठी आहे. तो त्याच्या महाराष्ट्रातील दहा, इतर राज्यांतील दोन अशा 12 मित्रांसह होस्टेलमध्ये आहे. होस्टेलशेजारी व मणिपूरमध्ये ठिकठिकाणी दोन समाजांत जातीय दंगल मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

यामध्ये होस्टेलच्या चोहोबाजूंनी बॉम्बस्फोट व गोळीबार चालू होता. तेथे विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी लष्कर अगर पोलिस खात्यातील कोणीही नव्हते. या भयंकर परिस्थितीत काहीही करा; परंतु माझ्या मुलाला व त्याच्या मित्रांना वाचविण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनवणी कोडग यांनी वरे यांना केली.

त्यावर वरे यांनी शुक्रवारी (दि. 5) सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे जाऊ, असे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोडग यांनी एवढाही वेळ नाही, कधीही होस्टेलवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. त्यावर प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वरे यांनी पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहायक गजानन पाटील, सुप्रिया सुळे यांचे स्वीय सहायक मयूर जगताप यांचे नंबर त्यांना दिले. कोडग यांनी तातडीने राऊत यांच्याशी संपर्क साधला. राऊत यांना संबंधित मुलांना आलेली अडचण सांगितली. तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मणिपूरच्या राज्यपालांना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सांगितले.

त्यानंतर राज्यपाल भवनातून वेगाने सूत्रे हलली. रात्री 12 वाजता मणिपूर मिलिटरीचे चिफ कमांडर यांनी कोडग यांचा मुलगा मयूर कोडग याच्याशी संपर्क साधला. काही काळजी करू नका, सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी लवकरच येत असल्याचे कळविले. तसे त्यांनी सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविले. पवार यांच्यामुळेच कोडग आणि इतर मुलांची सुखरूप सुटका झाल्याचे वरे यांनी सांगितले.

Back to top button