नांदेड, किरकटवाडीत पाणीपुरवठा विस्कळीत; गेल्या दहा वर्षांत नागरीकरण वाढले | पुढारी

नांदेड, किरकटवाडीत पाणीपुरवठा विस्कळीत; गेल्या दहा वर्षांत नागरीकरण वाढले

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : नांदेड, किरकटवाडी परिसराची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत दुपटीने वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे या भागात होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. सर्वांत गंभीर स्थिती 35 हजार लोकसंख्या असलेल्या नांदेड गावाची आहे. हाकेच्या अंतरावर खडकवासला धरण आहे. मात्र, नांदेड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिनीतून मुठा कालव्याशेजारी नांदेड येथील पाणीपुरवठा विहिरीत पाणी सोडले जात आहे.

या विहिरीतून नांदेडचे 8, किरकटवाडीचे 7 व नांदोशीचे 2, अशा एकूण 17 पंपांतून पाणीउपसा केला जात आहे. नांदोशी वगळता सर्व भागांत लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे दीड, दोन तासांतच विहिरीतील पाण्याची पातळी खाली जात आहे. परिणामी, पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले म्हणाले की, नांदेडच्या पाणीपुरवठा योजनेचे बहुतेक पंप जुने झाले आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणीउपसा होत नाही. पुण्याच्या बंदिस्त जलवाहिनीतून मिळणार्‍या पाण्यात पंचवीस टक्के वाढ करण्यात यावी. पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अक्षय गावित म्हणाले, की स्थानिक नागरिकांसह पाणीपुरवठा योजनेतील त्रुटीची पाहणी करून लवकरच अहवाल सादर केला जाईल.

पाण्याची मागणी वाढली

महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी, खडकवासला, नांदेड, किरकटवाडी आदी गावांना पुण्याच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात आहे. या परिसराची लोकसंख्या अलीकडच्या काळात जवळपास चारपटीने वाढली आहे. मात्र, बंदिस्त जलवाहिनीतून मिळणार्‍या पाण्यात वाढ झाली नाही. यामुळे परिसरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे.

एकाच विहिरीवर ताण

ग्रामपंचायत काळात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नांदेड फाट्याजवळील मुठा कालव्यालगत 1980 मध्ये पाणीपुरवठ्यासाठी विहीर बांधण्यात आली. तसेच, उंच टाकीही उभारली. त्या वेळी फक्त नांदेड गावालाच येथून पाणीपुरवठा सुरू होता. नंतर किरकटवाडी, कोल्हेवाडी, डीएसके विश्व, नांदोशी परिसराला नांदेडच्या विहिरीतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. एकाच विहिरीवर या भागातील सुमारे एक लाख रहिवाशांना तहान भागवावी लागत आहे.

किरकटवाडी, नांदेड व परिसरातील पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने पाहणी केली जाणार असून, तातडीने आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांना पुरेशा प्रमाणात शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. जुने पंप बदलण्यासह इतर उपाययोजनांची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली आहे.
                    -दीपक सपकाळ, उपविभागीय अभियंता,
                    पाणीपुरवठा विभाग, सिंहगड रोड

Back to top button