मित्रासाठी काय पण ! जामिनावर बाहेर काढण्यासाठी तिघांनी फोडल्या दानपेट्या | पुढारी

मित्रासाठी काय पण ! जामिनावर बाहेर काढण्यासाठी तिघांनी फोडल्या दानपेट्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कात्रज – कोंढवा रस्त्यावरील जैन मंदिराची खिडकी फोडून आतमध्ये प्रवेश करीत दानपेट्या फोडणार्‍या तिघांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली. तर, त्यांच्या चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांचा मित्र ऋषीकेश गाडे ऊर्फ हुक्या हा सध्या मोक्का केसमध्ये कारागृहात आहे. त्याला जामिनावर बाहेर काढण्यासाठी पैशांची गरज असल्याने आरोपींनी संगनमताने ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

आरोपींनी एकूण चार दानपेट्या फोडून पैसे चोरून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी टोळीला अटक करून त्यांच्याकडून 37 हजार रुपयांची रोकड जप्त केली. हसन मगदुम बादशाह ईटगी (18, रा. कात्रज), तेजस दीपक सणस ऊर्फ चिक्या (19, रा. कात्रज), आदित्य राजू नाडे (18, रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 26 एप्रिल रोजी मध्यरात्री कात्रज – कोंढवा रस्त्यावरील शत्रुंजय जैन मंदिर येथे ही घटना घडली होती. याबाबत मंदिराचे व्यवस्थापक राजकुमार बन्सीलाल राजपूत यांनी फिर्याद दिली आहे.

घटना घडल्यापासून कोंढवा पोलिस आरोपींच्या मागावर होते. पोलिसांकडून आरोपीचा माग काढत असतानाच संबंधित गुन्ह्यातील आरोपी हा इस्कॉन मंदिराच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीजवळ थांबल्याची माहिती तपास पथकातील अंमलदारांना मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली. यानुसार पोलिसांनी त्याला साथीदारांना अटक केली.

तर, चार अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 37 हजार 212 रुपये रक्कम जप्त केली. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, अंमलदार सुरज शुक्ला, अनिल बनकर, सतीश चव्हाण, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, ज्योतिबा पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Back to top button