पुणे : व्यापार्‍यांची फसवणूक करून पसार झालेला अटकेत | पुढारी

पुणे : व्यापार्‍यांची फसवणूक करून पसार झालेला अटकेत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भुसार मालाची विक्री करणार्‍या व्यापार्‍यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता पसार झालेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीने पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली जिल्ह्यांतील व्यापार्‍यांची फसवणूक केली होती. गेले वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. हितेश नानकराम आसवानी (वय 35, रा. दत्तनगर, भांडेवाडी, बगडगंज, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी त्याचा साथीदार भूषण वसंत तन्ना (रा. लवकुश, वाठोड रिंग रोड, नागपूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आसवानी आणि तन्ना यांनी पिंपरीतील काळेवाडी परिसरात राधा एंटरप्रायजेस नावाने व्यवसाय सुरू केला होता. आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली जिल्ह्यांतील व्यापार्‍यांकडून तूप, गूळ, बदाम, सुपारी, रवा असा माल मोठ्या प्रमाणावर खरेदी केला होता. सुरुवातीला आसवानी आणि तन्ना यांनी व्यापार्‍यांचे पैसे दिले. त्यानंतर व्यापार्‍यांची पैसे थकवून दोघेजण पसार झाले.

आरोपींच्या विरुद्ध पुण्यातील स्वारगेट, सांगलीतील तासगाव, नागपूरमधील लकडगंज, नंदनवन, तहसील पोलिस ठाण्यात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल झाले होते. आरोपी आसवानी पिंपळे गुरव परिसरात येणार असल्याची माहिती स्वारगेट पोलिस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आसवानीला पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील अजिंक्य शिर्के यांनी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारु, सोमनाथ कांबळे, शिवदत्त गायकवाड, फिरोज शेख, प्रवीण गोडसे, रमेश चव्हाण यांनी ही कारवाई केली.

Back to top button