पालकमंत्री चंद्रकांत पाटील करणार पदाधिकारी निवडीवर शिक्कामोर्तब | पुढारी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील करणार पदाधिकारी निवडीवर शिक्कामोर्तब

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदांची निवड मंगळवारी होत असून, पदाधिकारी निवडीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा कायम राहण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्यादृष्टीने भाजप नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनच दोन्ही पदांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते. शिवाय पदाधिकारी निवडीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेल प्रमुखांचीही महत्त्वाची भूमिका राहील, असे सांगण्यात आले.

बाजार समितीच्या पहिल्या पदाधिकारी निवडीसाठी अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी सभेची सूचना जारी केली आहे. त्यानुसार नव्या संचालक मंडळाची बैठक बाजार समितीच्या मार्केट यार्डातील मुख्यालयात मंगळवारी (दि.9) सकाळी 11 वाजता होत आहे. बाजार समितीवर भाजपसह सर्वपक्षीय पॅनेलमध्ये 18 पैकी 13 संचालक निवडून आलेले आहेत.

या पॅनेलने राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडविल्याने त्यांना केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. व्यापारी-अडते 2 आणि हमाल-मापाडी 1 संचालक आहेत. पदाधिकारी निवडीत रस्सीखेच झाल्यास या तीन संचालकांची मते निर्णायक ठरू शकतात. बाजार समितीवरील विजयी झालेल्या संचालकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कारण बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीत (हवेली तालुका) भाजपचे 3 संचालक निवडून आलेले आहेत. त्यामध्ये भाजपचे रोहिदास उंद्रे,सुदर्शन चौधरी आणि रवींद्र कंद यांचा समावेश आहे. तर सभापतिपदाच्या मुख्य शर्यतीत माजी सभापती रोहिदास उंद्रे यांचे नाव आघाडीवर आहे.

दिलीप काळभोर, प्रकाश जगतापही शर्यतीत

अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीतील सर्वपक्षीय पॅनेलमध्ये मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यही संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे सभापतिपद भाजपकडे गेल्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उपसभापतिपद हे अन्य पक्षातील संचालकांना द्यावे लागेल, अशी अटकळ बांधली जात आहे. असे असले तरी सभापती पदाच्या शर्यतीत बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर आणि प्रकाश जगताप यांचीही नावे शर्यतीत आहेत.

पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे कारण पुढे करीत विकास दांगट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली तरी दांगट यांनी भाजपच्या प्रदीप कंद यांच्यासह पॅनेलच्या एकहाती विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे उपसभापती पदासाठी नितीन दांगट आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत काळभोर यांच्यापैकी एखादे नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते किंवा पुढे संधी दिली जाऊ शकते. सर्वपक्षीय पॅनेल म्हणत असताना केवळ भाजपला दोन्ही पदे न देता अन्य पक्षांनाही बरोबरीने घेण्याचा मेळ चंद्रकांत पाटील आणि सर्वपक्षीय पॅनेलचे नेते कसे घालणार? याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

Back to top button