जुनी सांगवीतील भाजी मंडई धूळखात पडून ! | पुढारी

जुनी सांगवीतील भाजी मंडई धूळखात पडून !

नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांपासून जुनी सांगवी येथील 76 गाळे असणारे महापालिकेचे स्व. राजीव गांधी भाजी मार्केट सध्या धूळखात पडून आहे. छोटे गाळे, गाळ्यांच्या संख्येच्या तुलनेत तिपटीने असणारे भाजी विक्रेते, पालिकेचे न परवडणारे भाडे व पूर्वी गल्लोगल्ली फेरी करून होणारी भाजी विक्रीचा परिणाम यामुळे भाजी विक्रेत्यांनी पाठ फिरवल्याने हे भाजी मार्केट धूळखात पडून आहे. महापालिकेकडून व तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून दोन वर्षापुर्वी येथील डागडूजी, सुशोभीकरण करून भाजी मार्केट सुरू करण्याचा खटाटोप करण्यात आला होता. मात्र पुन्हा काही दिवसानंतरच भाजी विक्रेत्यांनी या भाजी मार्केटकडे पाठ फिरवली. यामुळे सुशोभीकरणचा खर्च वाया गेला.

याआधी मुख्य रस्त्यावर होणार्‍या भाजी विक्रीमुळे रहदारीची समस्या निर्माण झाल्याने काही काळ ढोरे नगर गल्ली व रस्त्याच्याकडेला भाजी विक्री करण्यात येत होती. त्यानंतर भाजी मार्केटच्या शेजारी एका पावलावर असणार्‍या गजानन महाराज मंदिरासमोरील मोकळ्या मैदानावर गेली दोन वर्षांपासून भाजी मार्केट सुरू करण्यात आले. त्यामुळे शेजारीच छत, पाणी, लाईट व मूलभूत सुविधा असणारे भाजी मार्केट मात्र धूळखात पडून राहिले आहे.

परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले जुनी सांगवीतील हे एकमेव मैदान असून, येथे मोठमोठ्या नेत्यांच्या राजकीय सभा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. दिवाळी पहाट, अखंड हरिनाम सप्ताह, संगीत महोत्सव अशा आठवडाभर चालणार्‍या कार्यक्रमावेळी पुन्हा येथील भाजी विक्रेत्यांना या मागील गल्लीत स्थलांतरित केले जाते. यामुळे भाजी खरेदी करणार्‍या नागरिकांची जागा बदलल्याने फरफट होते. परिणामी पार्कींग व रहदारीची समस्या निर्माण होते.

जुनी सांगवीत भाजी मंडईची स्थिती पुढीलप्रमाणे : सांगवीतील मध्यवर्ती भागात 76 गाळे असलेले राजीव गांधी भाजी मार्केट, भाजी मार्केट गेली पंधरा वर्षांपासून धूळखात पडून, दोनदा खर्च करूनही प्रयत्न फसला, भाजी विक्रेत्यांचे म्हणणे व मागण्या ऐकून प्रशासनाकडून भाजी मार्केट सुरू करावे असा मत प्रवाह, भाजी मार्केट पुन्हा सुरू झाल्यास मैदान मोकळे राहणार, पार्कींग व रहदारीचा प्रश्न मार्गी लागेल, शाळेसमोरचा गजबजाट कमी होणार, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमास मैदान मोकळे राहील.

समन्वयाचा अभाव…
सध्या भाजी विक्री होत असलेल्या मोकळ्या मैदानासमोर पालिकेचे करसंकलन कार्यालय, पालिकेची शाळा, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र आहे. बंद असलेले भाजी मार्केट सुरू करण्यात प्रशासनास अपयश येत आहे. सर्व सुविधा पुरवूनही गेली अनेक वर्षांपासून हे भाजी मार्केट बंद स्थितीत असल्याने लोकप्रतिनिधी, भाजी विक्रेते व पालिका प्रशासन यांचा समन्वय न झाल्याने सद्यस्थितीत भाजी मार्केट धूळखात पडून आहे. भाजी विक्रेत्यांची संख्या लक्षात घेऊन ज्या त्या भागात हॉकर्स झोन निर्माण करून भाजी मार्केट सुरू करण्याचा दोन वर्षांपूर्वीचा लोकप्रतिनिधींचा प्रयत्नही फसला. तो प्रशासनाकडून तरी पुर्ण होऊन भाजी विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून समन्वय साधून पालिका प्रशासनाने येथील भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लावाव, असे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे. भाजी विक्रेत्यांना महापालिकेचे भाडे परवडत नसल्याची आधी तक्रार होती. विक्रेत्यांचा विचार करून सर्वांना यात सामावून घेणे गरजेचे आहे.
             – बाबासाहेब ढमाले, अध्यक्ष अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ.

येथील परिस्थितीची माहिती अडचणी लक्षात घेऊन भाजी मार्केट सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
– उमाकांत गायकवाड, ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी

Back to top button