

वर्षा कांबळे :
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 112 शाळांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अटेन्डन्स प्रणाली आणि विद्यार्थ्यांचे इमोशन आणि वर्तन विश्लेषक करण्याचे सॉफ्टवेअर येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. यासाठी 5300 विद्यार्थी व 572 शिक्षकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी
शिक्षकांचे रजिस्ट्रेशन बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड आणि मे. ऐडीक सोलुशन प्रा. लि. यांच्या मार्फत शिक्षण विभागाच्या आदेशाने करण्यात आले. त्यासाठी 28 आणि 29 एप्रिल रोजी शाळेतील शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच, 1 मे रोजी प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, तुकडी, जन्म दिनांक, रक्त गट, पालकांची माहिती, पत्ता, मोबाईल नंबर आणि त्यांचा 3 वेगवेगळ्या अँगलचा फोटो अॅप्लिकेशनद्वारे घेतला गेला. प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या मदतीला मे. ऐडीक सोलुशन यांनी नेमलेले 35 समन्वयक यांनी वेगवेगळ्या शाळांना भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले व ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकांना मदत केली. या प्रणालीचे काम मे महिन्यातच पूर्ण होणार असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी 14 जूननंतर
राहिलेल्या व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांंची नोंदणी 14 जूननंतर करण्यात येणार आहे. पालिकेच्या एकूण 112 शाळा असून 1 मेच्या रजिस्ट्रेशन ड्राईव्हमध्ये बहुतांश प्राथमिक शाळांच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केले. परंतु, ज्या शाळेत विद्यार्थी उपलब्ध नव्हते अशा शाळांमध्ये शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात रजिस्ट्रेशन प्रक्रिया राबवणार असल्याचे प्रकल्प प्रतिनिंधीनी सांगितले आहे.
असा आहे ई- क्लासरूम प्रकल्प
स्मार्ट सिटीअंतर्गत हा प्रकल्प राबविला जात असून, त्यात स्मार्ट इंटरॅक्टिव्ह टीव्ही , कॉम्पुटर लॅब, स्टेम लॅब, रोबोटिक्स, शाळेच्या आतील नेटवर्किंग, मल्टिमीडिया कन्टेन्ट, बाला आणि आर्टीफिशिअल इंन्टेलिजन्स सॉफ्टवेअर आधारित शैक्षणिक प्रणाली याचा समावेश आहे. स्मार्ट इंटरॅक्टिव्ह टीव्ही , कॉम्पुटर लॅब, स्टेम लॅब, रोबोटिक्स, शाळेच्या आतील नेटवर्किंग, मल्टिमीडिया कन्टेन्ट पालिकेच्या 112 शाळां मध्ये दोन टप्प्यात बसविण्याचे काम एप्रिल 2021 मधेच पूर्ण झाले होते. त्यातील बाला घटका अंतर्गत एकूण 40 शाळांमध्ये शैक्षणिक पेटिंगचे काम शिक्षण विभागाच्या ऑर्डरनुसार एप्रिल 2023 मध्ये पूर्ण झाले असून आता आर्टीफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे.
या प्रणालीमध्ये एका वर्गात दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जे वर्गातील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी आणि त्याच्या वर्तणुकीवर लक्ष राहणार आहे. वर्गात विद्यार्थी खेळताना किंवा भांडताना कोणाला लागले तर सॉफ्टवेअर डिटेक्ट करणार. सॉफ्टवेअर रन होईल तेव्हा अॅनालिसिस करेल की, विद्यार्थ्याचा कोणत्या तासाला त्याचा मूड कसा होता. यामध्ये भांडण झाले तर फाईट, पडला तर फॉल डाऊन, लागले तर डेंजर असे सॉफ्टवेअर ते डिटेक्ट करणार आहे.
– शेखर खैरमोडे, प्रकल्प अधिकारी, म्युनिसिपल ई – क्लास रुम