..तर मी अमोल कोल्हेंचा प्रचार करेन ! शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्पष्टीकरण | पुढारी

..तर मी अमोल कोल्हेंचा प्रचार करेन ! शिवाजीराव आढळराव पाटील यांचे स्पष्टीकरण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे जर भाजपमध्ये गेल्यास भाजप व शिवसेना युतीची ताकद वाढणार आहे. त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले जाईल. शिरूर मतदारसंघ सोडून ते इतर ठिकाणी निवडणूक लढणार असतील, तर त्यांचा प्रचार मी करेन, असे शिवसेनेचे (शिंदे गट) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी (दि. 4) स्पष्ट केले. भोसरी विधानसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड महापालिकेसंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न व समस्यांबाबत ते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते पालिकेत पत्रकारांशी बोलत होते. या वेळी इरफान सय्यद, संभाजी शिरसाठ, दत्तात्रय भालेराव, मनीषा परांडे, मानसिंग जाधव आदी उपस्थित होते.

खा. आढळराव पाटील म्हणाले की, खा. कोल्हे भाजपमध्ये येणार की नाही हे माहिती नाही. मात्र, ते भाजपमध्ये गेल्यास त्यांचे स्वागत आहे. त्यामुळे युतीची ताकद वाढणार आहे. ते जखमी झाले असून, लवकर बरे व्हावेत, अशी माझी भावना आहे. शिरूर मतदारसंघासाठी भाजप आग्रही असल्याबद्दल ते म्हणाले, की ज्या ठिकाणी पराभव झाला तेथे अधिक लक्ष देण्याची भाजपची रणनिती आहे. मात्र, युतीमध्ये ती जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे मी लढणार आहे. पराभव झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून मी काम करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत सध्या काहीच कळत नसल्याचे ते म्हणाले.

चिखली पाणीपुरवठ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार
पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणी दिले जात आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून 100 एमएलडी पाणीपुरवठा नोव्हेंबर 2023 पासून रखडला आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की ही बाब मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. येत्या 15 दिवसांत उद्घाटन करून शहराला पाणी देण्याचे नियोजन केले जाईल. तर, भामा आसखेड व आंद्रा धरण प्रकल्प पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे आयुक्तांनी उत्तर दिल्याचे त्यांनी खा. आढळराव यांनी सांगितले. तसेच, अनधिकृत होर्डिंग, दूषित पाणीपुरवठा, शालेय साहित्य खरेदी, फायली गहाळ प्रकरण, प्रलंबित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, कुदळवाडी अग्निशामक दल, नेत्र रुग्णालय, अण्णासाहेब मगर स्टेडियम, नाशिक फाटा ते मोशी रस्ता रुंदीकरण, स्पाईन रोड आदींसह उपयोगकर्ता शुल्क व मिळकत हस्तांतरणाचे 0.5 टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

Back to top button