राज ठाकरेंनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले पुढे काय लिहू, गप्प बसा आता.. | पुढारी

राज ठाकरेंनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले पुढे काय लिहू, गप्प बसा आता..

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणाच्या सद्यस्थितीवर भाष्य करीत अजित पावार यांचे व्यंगचित्र काढले. चित्र पूर्ण होताच लोकांना म्हणाले, पुढे काय लिहू आता गप्प बसा असे लिहावे लागेल. आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र दिनानिमित्त कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्या वतीने बालगन्धर्व रंगमंदिरात जगभरातील व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याचे उदघाटन शुक्रवारी सकाळी 10 वाजता झाले. त्यांना रत्नागिरीला जायचे असल्याने त्यांनी थोडावेळ काढत या ठिकाणी भेट दिली.

व्यासपीठावर उभ्यानेच त्यांनी सर्वांशी संवाद साधला, ते म्हणाले हल्ली अतिव्यस्त असल्याने मला व्यंगचित्र काढायला खरोखर वेळ मिळत नाही. पण माझे पहिले प्रेम व्यंगचित्र अन दुसरे राजकारण आहे. मी आता निघतो कारण मला पुढे रत्नागिरीला जायचे आहे. पण कार्टुनिस्ट कंबाईन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीआग्रह केला की, जाता जाता महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकिय स्थितीवर व्यंगचित्र काढा.

व्यासपीठावर कॅनव्हास बोर्ड दिला गेला. मग राज यांनी उभ्यानेच घाईत काय काढू आसा विचार करीत काळा मार्कर हातात घेऊन क्षणभर विचार केला. पण पुढच्या सेकंदाला त्यांच्या कुंचल्यातून कागदावर प्रकटले ते राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अजित पवार. याकडे न्याहाळत ते लोकांना म्हणाले, आता पुढे काय लिहू तुम्हीच सांगा.? गप्प बसा असे लिहू का? त्यावर टाळ्या पडल्या अन राज ठाकरे सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडले.

राज ठाकरे कार्टून काढल्यावर परत माईक जवळ आले म्हणाले, माफ करा मला अजित पवार जसे पाहिजे तसे जमले नाहीत कारण मला उभे राहून व्यंगचित्र काढण्याची सवय नाही. मला बाळासाहेबांसारखी एका जागी बसून काढण्याची संवय आहे त्यामुळे हे जे काढलं आहे ते गोड मानून घ्या.

Back to top button