अनुभव उत्कृष्ट अभिनय शिकवू शकतात; अभिनेता नाना पाटेकर यांचे विचार | पुढारी

अनुभव उत्कृष्ट अभिनय शिकवू शकतात; अभिनेता नाना पाटेकर यांचे विचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभिनय शिकवला जाऊ शकत नाही, तर तो आतून यावा लागतो. पुस्तकांपेक्षा रोज भेटणार्‍या लोकांना वाचायला शिका. जीवनात आलेले अनुभव व्यक्तीला उत्कृष्ट अभिनय शिकवू शकतात. परंतु, अभिनय हा सतत अंधकारात टाळ्या शोधत असतो. त्यामुळे यातून स्वतःला सावरा, असे विचार अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे येत्या शैक्षणिक वर्षात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ’दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूल’ चे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, संजय कामटेकर, प्र-कुलगुरू डॉ. तपन पांडा, कुलसचिव गणेश पोकळे आदी उपस्थित होते.

पाटेकर म्हणाले की, कलाकार होणे म्हणजे आयुष्यभर दु:खी राहणारा. कारण, रोजच्या अभिनयात सुख व दु:ख उधार घ्यावे लागते. यामध्ये आपण स्वतःबरोबरच कुटुंबालाही विसरत जातो. पुढे सर्व गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हा हातातून सर्व काही निसटलेले असते. रोजच्या जीवनात सुख-दु:खाची व्याख्या बदलली, तरच सुखी राहाल. कठीण परिश्रमाच्या आजूबाजूला यश असते. जीवनात काहीच कठीण नाही. त्यासाठी फक्त विचार सकारात्मक ठेवा. सिंग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रीती जोशी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Back to top button