कालठण नंबर दोन येथे धाडसी चोरी; इंदापूर तालुक्यात भीतीचे वातावरण | पुढारी

कालठण नंबर दोन येथे धाडसी चोरी; इंदापूर तालुक्यात भीतीचे वातावरण

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 2 येथे बुधवारी (दि. 3) रात्री चार अज्ञात चोरट्यांनी एका ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवीत दोन मोबाईल फोन तर दुसरीकडे धाडसी चोरी केली. या दोन्ही घटनेमध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण 4 लाख 80 हजारांचा माल लंपास केला. याबाबत इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे.

याबाबत सागर नामदेव रेडके (वय 30, रा. कालठण नंबर 2, ता. इंदापूर) यांनी फिर्याद नोंदविली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी रात्री 12 ते 2 च्या दरम्यान फिर्यादीचे राहते घराजवळ राहणार्‍या नवनाथ हरिदास मेटकरी यांचे घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी लाथाबुक्क्यांनी मारहान करून जबरदस्तीने 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावून नेले.

या वेळी मेटकरी यांनी मदतीसाठी बोलविल्याने त्यांच्यासह फिर्यादी परिसरात चोरांचा शोध घेत फिरून येण्यापूर्वी त्यांच्याच घरातील रूमचे कुलूप तोडून चोरांनी घरातील कपाटातील 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र, 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, 40 हजार रुपये किमतीची अंगठी, 30 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे चकोर, 45 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व 75 हजार रुपये किमतीची दुसरी सोन्याची चेन असे एकूण 4 लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच मेटकरी यांचे 20 हजार रुपयाचे मोबाईल असे एकूण 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्दाम चोरून नेला. यातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक लंगुटे करीत आहेत.

Back to top button