रोहित पवारांना साखर आयुक्तांचा दणका; भाजप आमदाराने केली होती तक्रार, काय आहे प्रकरण ? | पुढारी

रोहित पवारांना साखर आयुक्तांचा दणका; भाजप आमदाराने केली होती तक्रार, काय आहे प्रकरण ?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : साखर आयुक्तालयाकडून परवाना न घेताच ऊस गाळप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या इंदापूर (जि. पुणे) येथील बारामती अ‍ॅग्रो या साखर कारखान्यास 4 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारखान्याने हंगाम 2022-23 मध्ये विनापरवाना केलेल्या 900 टन ऊस गाळपावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

भाजपचे आमदार राम शिंदे यांनी बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याने विनापरवाना ऊसगाळप सुरू केल्याची लेखी तक्रार साखर आयुक्तांकडे केली होती. त्यावरून राजकारण तापले होते. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2022 पासून सुरू करण्याचा निर्णय झाला होता.

त्यापूर्वीच हा कारखाना सुरू झाल्याच्या तक्रारीवर सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक (साखर) अजय देशमुख यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या अहवालानुसार कारखान्यावर स्थळपाहणी केली असता, कारखान्याचा सन 2022-23 चा गळीत हंगाम सुरू झाला नसल्याचे दिसून आले. या प्रकरणी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. तसेच विशेष लेखापरीक्षकांच्या चौकशी अहवालात विसंगती आढळल्याने त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली.

त्यानंतर सहकारी संस्थांचे अपर निबंधक (पतसंस्था) ज्ञानदेव मुकणे यांच्याकडून याप्रश्नी फेरचौकशी नेमण्यात आली. देशमुख यांच्या अहवालात नमूद केलेला 170 टन ऊस आणि मुकणे यांच्या अहवालानुसार केन यार्डात अंदाजे 800 ते 900 टन ऊस यापैकी जास्त असलेल्या 900 टन उसाचे गाळप झाले आहे, असे गृहीत धरून प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार दंड करणे सयुक्तिक असल्याचे आयुक्तांनी याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

Back to top button