शाळेच्या पहिल्या दिवशी नवीकोरी पुस्तके, पिंपरी चिंचवड महापालिकेची बालभारतीकडे 99 हजार पुस्तकांची मागणी | पुढारी

शाळेच्या पहिल्या दिवशी नवीकोरी पुस्तके, पिंपरी चिंचवड महापालिकेची बालभारतीकडे 99 हजार पुस्तकांची मागणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन पुस्तके मिळावीत, असे महापालिकेचे नियोजन असते. त्यानुसार, महापालिकेच्या अखत्यारित येणार्‍या शहरातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 99 हजार 391 पुस्तकांची मागणी केली आहे. यंदा 13 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शालेय साहित्य खरेदी करण्याची लगबग महापालिका शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने हे नियोजन केले आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित व खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यासाठी महापालिका शिक्षण विभागाने 2023 -24 या शैक्षणिक वर्षात शहरातील विद्यार्थ्यांसाठी बालभारतीकडे 99 हजार 391 पुस्तकांची मागणी केली आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तके असतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार, बालभारतीने पुस्तकांची छपाई केली आहे. शिक्षण विभागाच्या मागणीनुसार बालभारती कडून महापालिकेच्या पिंपरी आणि आकुर्डीच्या उन्नत केंद्रावर पुस्तके उपलब्ध केल्यावर जून महिन्यात 20 केंद्रांवरून ती वितरित करण्यात येतील. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवी कोरी पुस्तके पडणार आहेत. शाळेत विद्यार्थी आल्यावर त्यांचे स्वागत नवी कोरी पुस्तके देऊन केले जाणार आहे. यामुळे मुलांनाही शाळांबाबत गोडी तसेच इतर मुलांप्रमाणे आपल्या हातातही नवीन कोरी पुस्तके असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे.

माध्यम व इयत्तेनुसार पाठ्यपुस्तक मागणी
इयत्ता मराठी माध्यम हिंदी माध्यम इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम
1 ली 9422 251 588 452
2 री 9422 251 588 452
3 री 9422 250 595 452
4 थी 9542 355 595 458
5 वी 11306 431 1094 523
6 वी 11564 512 1002 582
7 वी 12400 434 1140 632
8 वी 12664 456 975 581
एकूण 85742 2940 6577 4132

Back to top button