पिंपरी-चिंचवड शहरात नालेसफाईचे काम संथगतीने | पुढारी

पिंपरी-चिंचवड शहरात नालेसफाईचे काम संथगतीने

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसाफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, पावसाळी गटारे स्वच्छ करण्यात येत आहेत. मात्र, हे काम कासवगतीने सुरू असल्याने 31 मेपूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. शहरात छोटे व मोठे असे एकूण 177 नाले आहेत. अ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 15, ब क्षेत्रीय भागात 19, क क्षेत्रीय परिसरात 29, ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 15, ई क्षेत्रीय कार्यालय परिसरात 20, फ क्षेत्रीय भागात 31, ग क्षेत्रीय हद्दीत 10 आणि ह क्षेत्रीय कार्यालय परिसरात 28 नाले आहेत. महापालिकेने बांधलेल्या या नाल्याची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी साफसफाई केली जाते.

वर्षभर उघडे असलेल्या या नाल्यात राडारोडा, कचरा, प्लास्टिक, भंगार व टाकाऊ साहित्य टाकले जाते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून ते घर व दुकानांमध्ये पाणी शिरते. तसेच, रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी होते. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाकडून उपाययोजना करून तात्पुरती कार्यवाही केली जाते. अशा घटना घडू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी आरोग्य विभागास दिले होते.

त्यानुसार गेल्या आठवड्यापासून नाले व पावसाळी गटारे साफ करण्यास सुरवात करण्यात आली आहे. पालिकेचे कर्मचारी व ठेकेदार नियुक्त करून हे काम केले जात आहे. मोठे नाले साफ करण्यासाठी स्थापत्य विभागाचे सहाय घेण्यात येत आहे. सध्या सुरू असलेले काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व नाले साफ होण्याची शक्यता कमी आहे. यासंदर्भात माहिती देण्यास आरोग्य विभागाच्या अधिकार्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे.

अनेक ठिकाणी नाले बुजविले
बांधकाम करण्यासाठी शहरातील काही नाल्यामध्ये राडारोडा टाकून नाले बुजविण्यात आले आहेत. तर, काही नाले अरूंद करण्यात आले आहेत. काही नाल्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. त्यामुळे काही नाले शहरातून गायब झाल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरी वस्तीत पाणी शिरत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रहिवाशांचे मोठे नुकसान होत आहे.

पावसाळ्यापूर्वी नाले सफाई पूर्ण करणार
शहरातील सर्व छोटे व मोठे नाले स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. मोठे नाले व आवश्यक ठिकाणी जेसीबीचा वापर केला जात आहे. पावसाळ्यार्पूर्वी सर्व नाले साफ करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

 

Back to top button