सांगा, आम्ही चालायचे कुठून ? कर्वेनगर येथील नागरिकांचा सवाल | पुढारी

सांगा, आम्ही चालायचे कुठून ? कर्वेनगर येथील नागरिकांचा सवाल

कोथरूड; पुढारी वृत्तसेवा : कर्वेनगर भागात गेल्या महिनाभरापासून पदपथ व रस्त्यांवर राडारोडा पडून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हा राडारोडा तातडीने उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कर्वेनगर, वारजे भाग सध्या झपाट्याने विकसित होत आहे. वारजे जकात नाक्याकडून कोथरूडकडे जाणार्‍या मार्गावर कर्वेनगर येथे उड्डाणपूल उभारला आहे. पुलालगत असलेल्या वडारवस्तीशेजारील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात येत असल्याचे दिसून येते असून, तो सध्या पदपथ व रस्त्यावर पसरू लागला आहे. याबाबत आरोग्य निरीक्षक राजेश अहिर यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

दुचाकी घसरून अपघात

राडारोड्यामुळे पदपथ पूर्णपणे व्यापला गेल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. राडारोड्यातील माती व खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहे. यामुळे दुचाकीस्वार जखमी होत आहेत. यामुळे रस्ता व पदपथावर पडलेला राडारोडा तातडीने उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button