फुरसुंगी : नाल्यांवरील अतिक्रमणामुळे पुराचा धोका | पुढारी

फुरसुंगी : नाल्यांवरील अतिक्रमणामुळे पुराचा धोका

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीतील फुरसुंगी, वडकी, उरुळी देवाची, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी परिसरातील ओढ्या-नाल्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, त्यामुळे आगामी पावसाळ्यात या भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी परिसरातील ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करून त्यांची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुणे शहरात जागा व घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे अनेक लोक उपनगरांच्या परिसरात कमी किमतीत घरे उपलब्ध होणारी घरे घेत आहेत. पूर्व हवेलीतील फुरसुंगी, वडकी, उरुळी देवाची, शेवाळवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी या परिसरात अनेक ठिकाणी शेतजमिनींचे प्लॉट पाडून गुंठेवारी करून जागा विकली जात आहे. अनेक काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांकडून मोठे गृहप्रकल्प राबविले जात आहेत.

परिसरातील सरकारी गायराने, वनजमिनींवरील लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. नैसर्गिक ओढे, नाले भराव टाकून बुजविले जात असून, त्या ठिकाणी बांधकामे केली जात आहेत. तर काही ठिकाणी ओढ्यातून खासगी रस्ते बनविले जात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांचे प्रवाहास अडथळा निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी ओढे व नाल्यांच्या पात्रांत राडारोडा, कचरा टाकण्यात येत आहे.

काही ठिकाणी तर ओढे, नाले गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे, त्यामुळे आगामी पावसाळ्यात या ओढ्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील ओढे व नाल्यांवरील आतिक्रमणे काढून त्यांचे प्रवाह मोकळे करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यापूर्वी फुरसुंगी व उरुळी देवाची येथील ओढे-नाले साफसफाईबाबत मुख्य खात्याचे अधीक्षक अभियंता संतोष तांदळे यांच्याशी संपर्क साधला असता ते कार्यक्षेत्रात उपलब्ध नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.

ओढ्या, नाल्यांची साफसफाई करणार कोण?

काही लोकांच्या स्वार्थापोटी राज्य सरकारने फुरसुंगी व उरुळी देवाची ही गावे पुणे महापालिकेतून वगळली आहेत. यामुळे या गावांचा विकास खुंटणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत या गावांतील ओढे, नाल्यांवरील अतिक्रमणे काढून त्यांची साफसफाई करणार कोण? पुराने नुकसान झाल्यास त्याला जबाबदारी कोण? असे प्रश्न उरुळी देवाचीचे माजी सरपंच डॉ. उल्हास शेवाळे यांनी उपस्थित केले आहेत.

ओढ्या-नाल्यांची साफसफाई, अतिक्रमणांवरील कारवाई, हे विषय महापालिकेच्या मुख्य खात्यांतर्गत येतात. दोन वर्षांपासून मुख्य खात्यामार्फत ओढे-नाले साफसफाईची कामे केली जात आहेत. हा विषय क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत नाही.

                         – प्रसाद काटकर, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय

Back to top button