राज्यातील कमाल तापमानाची कमाल | पुढारी

राज्यातील कमाल तापमानाची कमाल

 आशिष देशमुख

पुणे : मे महिन्यात संपूर्ण राज्याचे सरासरी तापमान 34 अंशांवर गेल्याने गेल्या अनेक वर्षांतील नीचांकी कमाल व किमान तापमानाचा विक्रम 2 मे रोजी नोंदविला गेला. दरवर्षी उन्हाळ्यात मार्च महिन्यात कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते. एप्रिलमध्ये ते अधिक वाढत जाऊन मेमध्ये त्याचा सर्वोच्च बिंदू असतो. मात्र, यंदा हिवाळ्यात असावे इतके कमी तापमान 2 मे रोजी राज्यात नोंदविले गेले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तसेच उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने राज्यात सतत तापमानात उतारच दिसत आहे.

चक्क मे महिन्यात तापमान 34 अंशांवर

दोन मे रोजी राज्यातील सर्वच शहरांचे कमाल तापमान सरासरी 34 अंशांवर आले. यात 4 ते 12.1 अंशांनी घट झाली. सर्वोच्च तापमान जळगावचे 36 अंश इतके नोंदविले गेले. मागच्या वर्षी मे महिन्यात हे तापमान 43 ते 44 अंशांवर गेले होते, तर किमान तापमानात 2 ते 6 अंशांनी घट झाली. राज्यात महाबळेश्वर येथे 14 इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. उन्हाळ्यात हे तापमान 18 ते 21 अंशांवर जाते.

विदर्भ थंड होतोय..

यंदाच्या उन्हाळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे उष्णतेच्या आगीत दरवर्षी धगधगणार्‍या विदर्भात चक्क उन्हाळ्यात सर्वांत कमी तापमान आहे. विदर्भाने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणला मागे टाकले आहे. 27 एप्रिल 2023 रोजी यवतमाळचे किमान तापमान 16.5, तर महाबळेश्वरचे 17.1 होते. यंदा किमान तापमानातही विदर्भाने चक्क महाबळेश्वरलाही मागे टाकल्याचा विक्रम झाला.

वार्‍याची खंडितता अर्थात कमी दाबाच्या पट्ट्यांची ही कमाल आहे. यंदा संपूर्ण राज्यात हे पट्टे संपूर्ण उन्हाळाभर निर्माण होत आहेत. त्यामुळे सतत पाऊस सुरू असल्याने तापमानात मोठी घट दिसत आहे. त्यातही विदर्भात हे पट्टे अधिक तीव्रतेने निर्माण होत असल्याने उन्हाळ्यात विदर्भात चक्क थंडावा जाणवत आहे.

                                           – माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

Back to top button