पुणे : ड्रोनद्वारे कळणार आगीची तीव्रता; अग्निशमन दलात अत्याधुनिक कॅमे-यांचा समावेश | पुढारी

पुणे : ड्रोनद्वारे कळणार आगीची तीव्रता; अग्निशमन दलात अत्याधुनिक कॅमे-यांचा समावेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अनेकदा उंचावरील इमारतीला लागलेली आग समजून येत नाही. त्यासाठी आता अग्निशमन दलात अत्याधुनिक पद्धतीच्या ड्रोन कॅमे-यांचा समावेश केला जाणार आहे. नुकतेच मुंबई येथे याबाबत चाचणी घेण्यात आली असून, पुण्यात त्याची सुरुवात करण्याची चाचपणी सुरू आहे. अशा अत्याधुनिक यंत्रणेचा समावेश अग्निशमन विभागाच्या ताफ्यात झाला, तर धोका आणि जवानांच्या वेळेबरोबरच श्रमाची बचत होणार असल्याचे अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले.

शहरातील मध्यवस्तीत पेठांचा समावेश आहे. गर्दीने गजबजलेली ही ठिकाणे असतात. अशावेळी आगीची घटना घडली तर वाहनाला पोहचण्यास वेळ होतो. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील गर्दी पाहण्याठी जीपीएस यंत्रणेचा वापर करून घटनास्थळापर्यंत कसे लवकर पोहचता येईल याबाबत काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रणेचा समावेश होतो आहे.

त्याचबरोबर प्रशिक्षणाच्या माध्यमातून जवानांना कार्यकुशल केले जाते आहे. इमारतीच्या उंचीनुसार अग्निशमन दलात शिड्या दाखल होत आहेत. मुंबईत 100 मीटरची शिडी दाखल झाली आहे. परंतु, तिचा वापर जागेची अडचण आणि वार्‍याच्या दिशेवर ठरतो. सध्या अग्निशमन दलाकडे हायड्रोलिक 70 मीटरपर्यंत जाणारी शिडी असून, त्या शिडीद्वारे आग विझविण्यासाठी 22 मजल्यावरूनदेखील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यास मदत होते.

अशा पध्दतीने कमी जागेत शिरणारे 24 मीटर शिडी असलेले वाहनही लवकरच अग्निशमन दलात दाखल होत आहे. अग्निशमन दलात सध्या आधुनिक वाहन दाखल आहे. हे बि—दींग अ‍ॅप्रेझल वाहन आहे. या वाहनामध्ये 35 ते 40 ऑक्सीजनचे सिलिंडर असून, मोठा धूर झालेल्या ठिकाणाहून धूर कमी करून नागरिकांना बाहेर काढता येते. तसेच ते रासायनिक वायू गळतीवेळीदेखील काम करते. पाच नवीन अग्निशमन वाहने दलात दाखल झाली आहेत. इमारत कोसळल्यानंतर स्लॅपटरसारखे यंत्र याप्रसंगी काम करते.

तर कुलींग फायर फ्रोझीग मेंटींग सुटची संख्या (आगीत वापरता येणारे)देखील पुणे अग्निशमन दलात 40 इतकी असल्याचे अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले. आंतराष्ट्रीय अग्निशमन दिवस हा पहिल्यांदा 1999 मध्ये साजरा केला गेला. ऑस्ट्रेलिच्या व्हिक्टोरीयामधील लिंटन येथील झाडांना आग लागली होती. या वेळी अचानक हवेची दिशा बदल्याने अग्निशमन करण्यासाठी गेलेल्या पाच जवानांचा मृत्यू झाला होता. त्यांनी दिलेल्या बलिदानाप्रती 4 मे हा दिवस जागतिक अग्निशमन दिवस म्हणून साजरा केला जातो.

शहरात सद्यस्थितीला मुख्य अग्निशमन केंद्रासह 19 उप अग्निशमन केंद्रासह 20 अग्निशमन केंद्र कार्यान्वित आहेत. शहरात बांधून तयार असलेली धायरी, चांदणी चौक, महमंदवाडी आणि खराडी येथील अग्निशमन केंद्र अद्यापही कार्यान्वित होऊ शकली नाहीत. अग्निशमन यंत्रणा मनुष्यबळाअभावी तुटपंजी पडत आहे. सुमारे 400 कर्मचारी आग नियंत्रणाचे काम करीत आहेत.

अग्निशामक दलाकडे असलेली साधने

मोठ्या फायरगाड्या 24
मिनी फायरगाडी 7
वॉटर टँकर 5 (12000 लिटर क्षमता असलेले 3 व 18000 लिटर क्षमता असलेले 2)
मोबाईल हायड्रंट
सिस्टीम व्हॅन 1
बी ए सेट व्हॅन 1
रेस्क्यू व्हॅन 2
हायड्रॉलिक प्लॅटफार्म
ब्रान्टो (उंच शिडीची गाडी) 3 (42 मीटरच्या दोन व 70 मीटरची एक)

Back to top button