बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती सुरू | पुढारी

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळाची निर्मिती सुरू झाली. तेथे वार्‍यांची चक्रीय स्थिती सुरू झाल्याने 48 तासांत त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. 8 मे रोजी चक्रीवादळ तयार होऊन उपसागर व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारी दुपारी बंगालच्या उपसागरात हालचाली सुरू झाल्याचे वृत्त हवामान विभागाने प्रसारित केले. तेथे वार्‍यांची चक्रीय स्थिती सुरू झाली असून, 6 मे रोजी त्याची तीव्रता वाढणार आहे.

7 मे रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होईल व 8 मे रोजी हे चक्रीवादळ उपसागराच्या उत्तरेकडे वळेल. दरम्यान, हिमालयात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला असून, त्यामुळे हिमालय ते उत्तर भारत व पुढे मध्य प्रदेशसह संपूर्ण देशात पावसाला सुरुवात झाली आहे. चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट होईल. 8 रोजी चक्रीवादळ तयार होताच पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. त्यामुळे राज्यात 12 मेपर्यंत वळीव पाऊस वाढणार आहे.

Back to top button