चहापेक्षा किटली गरम ! पुण्यातील टोईंग कामगारच दाखवतात पोलिसी खाक्या

चहापेक्षा किटली गरम ! पुण्यातील टोईंग कामगारच दाखवतात पोलिसी खाक्या

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नो-पार्किंगमधील वाहने उचलताना नागरिकांना टोईंग टेम्पो, क्रेनवरील मुजोर कामगारांच्या असभ्य वर्तनाचा सामना करावा लागतो. कारवाई करणारे पोलिस राहिले बाजूला, हेच कामगार आपणच पोलिस आहोत, अशा अविर्भावात वागतात. एवढेच नाही, तर ते झिरो पोलिसाचे कामदेखील करतात. त्यांनी वाहनचालकांकडून अवैध पद्धतीने पैसे घेतल्याच्यादेखील तक्रारी आहेत. मात्र, असे असताना वरिष्ठ पोलिस अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहेत.

दोन दिवसांपूर्वी हडपसर भागातील एका दुकानासमोर दुचाकी गाडी उचलण्याची कारवाई करताना दुकानदार आणि टोईंग व्हॅनच्या कामगारांमध्ये हाणामारी झाली. दुकानदाराने वीट उचलली तर कामगाराने शर्ट काढून त्याला बेदम चोपले. हा सर्व प्रकार टेम्पोवर नियंत्रक म्हणून काम करणार्‍या महिला पोलिसासमोर सुरू होता. याबाबतचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले.

वाहतूक नियमनापेक्षा पोलिस सावजाच्या शोधात अधिक असल्याचे सध्याचे चित्र आहे. टेम्पो क्रेनवरील परिस्थितीसुद्धा वेगळी नाही. एका बाजूने ठेकेदाराचे टेम्पोवरील कामगारांना, तर दुसरीकडे वाहतूक विभागातील अधिकार्‍यांचे पोलिसांना गाड्या टोईंग करण्याचे टार्गेट आहे. त्यामुळे त्यांच्या गाड्या सतत गर्दीच्या ठिकाणी भटकत असतात. एखाद्याने अनावधानाने गाडी नो पार्किंगच्या ठिकाणी पार्क केलेली असते. तो त्या ठिकाणी हजर असतानादेखील दोन मिनिटांसाठी त्याला दंड आकारला जातो. दंडाचा आकडा मोठा आहे. त्यामुळे साहजिकच त्यातून वादावादीच्या घटना घडतात. या वेळी वाहनचालक व टोईंगवरील पोलिस दोघांनी सामंजस्याची भूमिका घेणे
गरजेचे आहे.

साक्षात्कार चुकीचा..

टोईंग टेम्पोवर जर महिला पोलिस कर्मचारी असतील, तर नागरिकांसोबत त्यांच्या वादावादीच्या घटना कमी होतात, असे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यानुसार त्यांनी सर्व टोईंग टेम्पो आणि क्रेनवर नियंत्रक म्हणून महिला कर्मचार्‍यांची नेमणूक केली. मात्र, त्यांना हे कदाचित माहिती नसावे, शहरातील काही वाहतूक विभागात गेल्या कित्येक वर्षांपासून महिला कर्मचारी क्रेनवरीलच कर्तव्य करत आहेत. त्यांना दुसरे रस्त्यावरील नियमनाचे काम दिले तर चक्क त्या सुटी घेतात किंवा जोपर्यंत आपला टेम्पोचा टर्न येत नाही तोपर्यंत हजर होत नाहीत. त्यामुळे पुरुष पोलिसांना टेम्पो दिला म्हणजे वाद होतो अन् महिला पोलिसांची नेमणूक केली म्हणजे वाद होत नाही, असा साक्षात्कार चुकीचा आहे.

नियमाला हरताळ..

टोईंग कारवाईबाबत एक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात आली होती. त्यामध्ये क्रेनवरील कामगार हे नागरिकांशी बोलणार नाहीत. तसेच कारवाईत हस्तक्षेप करणार नाहीत. त्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी. त्यांना ठेकेदाराने ओळखपत्र द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, असे असतानादेखील हे कामगार नागरिकांसोबत हुज्जत घालताना दिसून येत आहेत. त्यामुळे ठेकेदाराकडून पोलिसांच्या एसओपीला केराची टोपली दाखवली जात आहे.

गुन्ह्याचा धाक..

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यापैकी बहुतांश गुन्हे हे वाहतूक पोलिसांकडून दाखल केले जात असल्याचे चित्र आहे. मात्र, प्रत्येक वेळी वाहनचालक चुकीचे वागतो, त्याच्याकडूनच गैरवर्तन होते असे नाही. अनेकदा काही पोलिसांची नागरिकांसोबत वागण्याची भाषा उद्धट असते. मात्र, वाहनचालकालाच प्रत्येकवेळी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्याला सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या नावाखाली गजाआड केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news