पुण्यातील तीन पुलांना स्थायी समितीची मंजुरी; या पुलांचा समावेश

पुण्यातील तीन पुलांना स्थायी समितीची मंजुरी; या पुलांचा समावेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुळा नदीवर बोपोडी-सांगवी येथील पुलासह मुठा नदीवर सनसिटी ते कर्वेनगर आणि कोरेगाव पार्क येथे साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्निर्माणास स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा बोपोडी ते सांगवीदरम्यान मुळा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने या कामासाठीची निविदा मागील वर्षीच काढली आहे. सुमारे 760 मी. लांब आणि 18.60 मी. रुंदीच्या या पुलासाठी पुणे महापालिकेच्या बाजूने अर्थात बोपोडीमध्ये 555 मीटरचा सेवा रस्ता असून, सांगवीच्या बाजूला 80 मी.चा सेवा रस्ता आहे. या पुलाच्या कामासाठी 36 कोटी 25 लाख रुपये खर्च आहे. यापैकी निम्मे अर्थात 18 कोटी 13 लाख रुपये पुणे महापालिकेने पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यायचे आहेत. ही रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली.

पूर्वीची निविदा झाली होती रद्द

महापालिकेने सनसिटी ते कर्वेनगर यादरम्यान पूल प्रस्तावित केला आहे. यासाठी पूर्वी निविदा प्रक्रिया राबवून काम प्रारंभ करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनी ही दिवाळखोरीत निघाल्याने काम सुरूच होऊ शकले नाही. त्यामुळे प्रशासनाने पूर्वीची निविदा रद्द करून फेरनिविदा मागविली होती. यामध्ये मे. विजय सुदाम पटेल या ठेकेदार कंपनीने 12 टक्के कमी दराने निविदा भरली. या निविदेला स्थायीने मंजुरी दिली.

साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलाचे पुनर्निर्माण

कोरेगाव पार्क ते बंडगार्डन पुलादरम्यानच्या वाहतुकीमध्ये साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल महत्त्वाचा दुवा आहे; परंतु हा पूल जुना असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. महापालिकेने या पुलावरील जड वाहतूक यापूर्वीच बंद केली असून, जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्यात येणार आहे. यासंबंधीच्या 56 कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news