पुणे शहरातील 26 चौकांतील सिग्नल बंद! | पुढारी

पुणे शहरातील 26 चौकांतील सिग्नल बंद!

हिरा सरवदे

पुणे : शहरातील 26 चौकांमधील सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. चौकांमधील सिग्नल व्यवस्था कोलमडल्याने दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा फटका आसपासच्या चौकांनाही बसत असल्याचे असल्याचे दै. ’पुढारी’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

शहरातील विविध रस्ते आणि चौकांमधील वाहतुकीचे नियमन वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून केले जाते. मात्र, शहरातील रस्त्यांची कामे, चौकांमधील कामे आणि सिग्नल आदी व्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे, त्यामुळे महापालिकेने शहरातील 277 लहान-मोठ्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसविली आहे. मात्र, यातील 26 चौकांमधील सिग्नल व्यवस्था मागील अनेक महिन्यांपासून विविध कारणांनी बंद आहे.

केबल वायर लॅम्प कंट्रोलर खराब झाल्याने 17 चौकांमधील सिग्नल यंत्रणा बंद आहे. मेट्रो आणि पुलाच्या कामामुळे प्रत्येकी तीन असे सहा चौकांमधील सिग्नल बंद आहेत. तर रस्त्यांच्या कामामुळे दोन आणि चौक सुधारणेच्या कामामुळे एका चौकातील यंत्रणा बंद आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांचा कस निघत आहे. शनिवारवाड्यासमोरील गाडगीळ चौकात एका बाजूला तब्बल चार आणि विरुद्ध बाजूस एक असे सहा सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र, यातील एकही सिग्नल सुरू नाही.

त्यामुळे शनिवारवाड्याकडून कुंभारवाडा चौक आणि कसबा पेठेकडे जाणारी वाहने आणि शिवाजी रस्त्यावरून येऊन शिवाजी रस्त्याकडे आणि कुंभारवाडा चौकाकडे जाणारी वाहने समोरासमोर येऊन थांबतात, त्यामुळे या चौकात दिवसभरात केव्हा वाहतूक कोंडी होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. विशेष म्हणजे या चौकात कोपर्‍यावर नो पार्किंगमधील दुचाकी उचलणारे टेम्पो येऊन थांबतात. त्यात वाहतूक पोलिस बसलेले असतात. मात्र, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे चित्र वारंवार पहायला मिळते.

पोलिसच बंद करतात सिग्नल !

सिग्नल यंत्रणा सुरू असताना पोलिस सिग्नल बंद ठेवतात. सिग्नल बंद असल्याची तक्रार करतात. तपासणी केल्यानंतर सिग्नल यंत्रणा सुरू असते. सिग्नल सुरू आहे, अशा अहवालावर पोलिसांना सही मागितल्यानंतर दिली जात नाही. सही मागणार्‍या कर्मचार्‍याला किंवा ठेकेदाराच्या व्यक्तीस पोलिसांकडून अरेरावीची भाषा वापरती जाते, अशी माहिती एका कर्मचार्‍याने दै. ’पुढारी’शी बोलताना दिली.

वाहतूक पोलिसांचे पालिकेला पत्र

शहरातील विविध चौकांमध्ये महापालिकेने उभारलेले अनेक सिग्नल बंद आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी बंद पडलेली सिग्नल यंत्रणा त्वरित दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचे पत्र महापालिकेच्या विद्युत विभागाला दिले आहे.

सावधान ! इथे केव्हाही होऊ शकते वाहतूक कोंडी

केबल वायर लॅम्प कंट्रोलर खराब झाल्याने सिग्नल बंद असलेले चौक

  • गाडगीळ पुतळा, शनिवारवाड्यासमोर
  • फडके हौद चौक
  • सोन्या मारुती चौक
  • नाझ चौक, कॅम्प
  • सोलापूर बाजार चौक
  • जांभुळकर चौक, वानवडी
  • शांतीनगर चौक, येरवडा
  • मेंटल कॉर्नर चौक
  • कळस फाटा चौक
  • पोस्ट ऑफिस चौक, येरवडा
  • संगमवाडी पार्किंग नं. 2
  • आळंदी रोड जंक्शन
  • साप्रस चौक
  • गरुड गणपती चौक
  • न्यू इंग्लिश स्कूल
  • रमणबाग चौक
  • तावरे कॉलनी चौक, सहकारनगर

मेट्रो कामामुळे सिग्नल बंद असलेले चौक

  • पर्णकुटी चौक, येरवडा
  • तारकेश्वर चौक
  • चव्हाण चौक

पुलाच्या कामामुळे नो सिग्नल

डायस प्लॉट चौक भाले चौक, येरवडा राजस सोसायटी चौक

रस्त्याच्या कामामुळे सिग्नल बंद असलेले चौक
राधा चौक, चतुःश्रृंगी चिंतामणीनगर

चौक सुधारणेच्या कामामुळे सिग्नल बंद असलेले चौक

नाथ पै चौक दत्तवाडी

शहरातील 26 चौकांमधील सिग्नल व्यवस्था बंद असल्याचे पत्र वाहतूक पोलिसांनी दिले आहे. त्यानुसार संबंधित ठेकेदारास त्या चौकांमध्ये जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यंत्रणा सुरू केल्यानंतर ती सुरू झाल्याच्या अहवालावर तेथील वाहतूक पोलिसांची सही घेण्याचे आदेश दिले आहेत.

                                                                     -श्रीनिवास कंदुल,
                                              मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका

Back to top button