बारावा महिनाही पावसाचा ! कडक उन्हाळ्यातही पुणेकर अनुभवताहेत पावसाळा | पुढारी

बारावा महिनाही पावसाचा ! कडक उन्हाळ्यातही पुणेकर अनुभवताहेत पावसाळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा ऋतूंचे सर्व संकेत धुडकावत वरुणराजा बाराही महिने बरसत आहे. जूनपासून पुणे शहरात प्रत्येक महिन्यात पावसाची बॅटिंग सुरू आहे. कडक उन्हाचा महिना म्हणजे मे. यातही बुधवारी शहराच्या काही काही भागात पाऊस झाला. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत संततधार पावसाने शहराला भिजवले, त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांची एकच धांदल उडाली. एका तासात शहरात 2 ते 2.5 मि. मी. पावसाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे वाहत आल्याने मंगळवारपासूनच शहरात गारवा सुटला व हलका पाऊस झाला. रात्री थंड वारे वाहत होते. बुधवारचा दिवस उजाडला तो शहरावर दाटलेल्या ढगांनी. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. वार्‍याच वेग कमी होता. गडगडाटी पाऊस नव्हता. मात्र संततधार झाला. या पावसामुळे रस्ते जलमय झाले. शहरातील सर्व पेठा व उपनगर भागांत या पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसाने शहरात पावसाळी वातावरण तयार झाले. कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली.

कमाल तापमान घसरले
(अंश सेल्सिअसमध्ये)

शिवाजीनगर – 33.9
पाषाण – 33.9
हडपसर – 34.4
एनडीए परिसर – 34.3
मगरपट्टा – 34.8

Back to top button