फायर मॅक्स, ऑनलाइन गेम्सचे वेड; उन्हाळी सुट्या असूनही मुले मैदानी खेळांपेक्षा मोबाईलमध्येच दंग | पुढारी

फायर मॅक्स, ऑनलाइन गेम्सचे वेड; उन्हाळी सुट्या असूनही मुले मैदानी खेळांपेक्षा मोबाईलमध्येच दंग

दीपेश सुराणा

पिंपरी (पुणे): सध्या शाळांच्या उन्हाळी सुट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मुले घरात असल्याने तासन्तास मोबाईलमध्ये विविध गेम्स खेळण्यात हरवून गेलेली दिसत आहेत. फ्री फायर मॅक्स व अन्य ऑनलाइन गेम्सचे जणू मुलांना वेडच लागल्यासारखे चित्र पाहण्यास मिळत आहे. मुलांना त्याचे व्यसन लागू नये, यासाठी पालकांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याची गरज मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

मुलांची उत्कंठा ताणून ठेवणारी आणि त्यांना तासनतास खिळवून ठेवणारे विविध गेम्स सध्या ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यातील काही गेम्स या ऑफलाइन खेळता येतात. तर, बर्याच गेम्स या ऑनलाइनदेखील खेळता येतात. त्यातही मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध गेम्समध्ये हिंसाचाराची दृष्ये पाहण्यास मिळतात. त्यामुळे मुलांच्या मनावर त्याचे वाईट परिणाम होत आहेत. पालकांनी मुलांना घेऊन दिलेला मोबाईल किंवा पालकांचा मोबाईल घेऊन मुले तासनतास अशा विविध गेम्स खेळण्यात व्यस्त झाल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.

उन्हामुळे मैदानी खेळ कमी

सध्या उन्हाचा तडाका चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे घराबाहेर पडून विविध खेळ खेळणे मुलांना शक्य होत नाही. घरात बसून विविध बैठे खेळ मुले खेळू शकतात. कॅरम, बुद्धीबळ, सापशिडी तसेच मुलांच्या बुद्धीला चालना देणारी वैज्ञानिक खेळणी देखील बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मात्र, मुलांकडून हे खेळ खूप कमी प्रमाणात खेळले जातात. त्याऐवजी टीव्हीवरील कार्टून्स आणि मोबाईलवर विविध गेम्स खेळण्यातच मुलांना जास्त स्वारस्य वाटत असल्याचे चित्र सध्या घरोघरी पाहण्यास मिळत आहेत.

मुले मोबाईलवर मर्यादेपेक्षा अधिक वेळ गेम्स खेळत असतील, त्यांना जर त्याचे व्यसन लागले असेल तर पालकांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. मुले पालकांचे ऐकत नसतील, चिडचिड करत असतील तर त्यांना समुपदेशनाची गरज लागू शकते.
– डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ

 

Back to top button