पिंपरी-चिंचवड पालिका उभारणार घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र | पुढारी

पिंपरी-चिंचवड पालिका उभारणार घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरात जमा होणारा घरगुती घातक कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र उभारले जाणार आहे, असे दोन केंद्र शहरात असणार आहेत. त्यासाठी साडेआठ कोटी तसेच, विविध कामांसाठी येणार्‍या खर्चास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंगळवारी (दि.2) मान्यता दिली. पालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. घरगुती घातक कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातर्फे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत दोन केंद्र उभारण्यात येणार आहेत.

त्यासाठी 8 कोटी 44 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. टिपिंग शुल्क 2 हजार 160 रुपये प्रति टनास देण्यात येणार आहे. हे काम सॉईलऑन इन्व्हायर्मेंट सोल्युशन व साई गणेश एंटरप्रायजेस यांना देण्यात आले आहे. पालिका भवन व इतर विविध कार्यालयातील संगणकीय केबल नेटवर्क करणे. पालिकेच्या नवीन कार्यालयांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणे. क क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक 8 मधील विविध उद्यानांची देखभाल करणे. क्रीडा विभागास आवश्यक विविध इंनडोअर जीम साहित्य नमुन्याचे स्पेशिफिकेशनप्रमाणे तांत्रिक तपासणी अहवालाकरिता पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठास मानधन देणे, आदी खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली.

मोठ्या रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई
शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग, बीआरटी रस्ते आणि 18 मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे. चिंचवड येथील एम्पायर इस्टेट येथील सेवा रस्त्यांचे डांबरीकरण करणे. एमडीआर-31 रस्त्यावरील खोदलेल्या चरांची व पदपथाची दुरुस्ती करणे व आवश्यकतेनुसार रस्ता रुंदीकरण करणे. बोपखेल फाटा ते आळंदी रस्त्याचे तसेच, देहू ते आळंदी रस्त्यावरील खोदलेल्या चरांची व पदपथाची दुरुस्ती करणे. टेल्को रस्त्यावरील चरांची व पदपथाची दुरुस्ती करणे.

कोरोना वैद्यकीय कचरा गोळा करणे. त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे. वैद्यकीय विभागामार्फत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची मानधनावर 11 महिन्यांकरिता नेमणूक करणे. आरोग्य विभागासाठी क्लॉथ बॅग व्हेंडिंग मशीन खरेदी करणे. पालिकेच्या विविध विभागास अभिलेख रुमाल खरेदी करणे. पालिका रुग्णालयांतील ओटी विभागास रुग्ण व डॉक्टरांसाठी गणवेश खरेदी करणे. विविध सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाचे स्वच्छता व देखभाल दुरुस्ती करणे.

Back to top button