शिवभोजन थाळीची चव उतरली ! ग्रामीण भागात 37 केंद्रे बंद, 11 रद्द ; 38 केंद्रे सुरू | पुढारी

शिवभोजन थाळीची चव उतरली ! ग्रामीण भागात 37 केंद्रे बंद, 11 रद्द ; 38 केंद्रे सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गरिबांना पोटापुरते खायला मिळावे, यासाठी सरकारने केवळ दहा रुपयांत जेवणाची योजना सुरू केली होती. सुरुवातीच्या काळातील काही तांत्रिक अडचणी वगळता ती सुरळीत होती. कोरोना काळात वर्षाला होणारा सुमारे सात कोटींचा खर्च आता अवघ्या तीन कोटी रुपयांवर आला आहे. अशीच अवस्था राहिल्यास शिवभोजन केंद्र चालविणे कठीण जाणार असल्याने आतापर्यंत ग्रामीण भागातील 37 केंद्रचालकांनी केंद्रे बंद केली आहेत. कोरोनाकाळात गरीब व गरजूंसाठी वरदान ठरणार्‍या शिवभोजन थाळी केंद्रासमोरील गर्दी आता ओसरायला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात 7 हजार 450 थाळी मंजूर असून, त्यातील 4 हजार 445 थाळींचाच लाभ घेतला जात आहे. त्यामुळे केंद्रचालकांनी लाभार्थी येत नसल्याने केंद्र बंद करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात एकूण 92 केंद्रे मंजूर होती. त्यातील 11 प्रशासनाने रद्द केली असून, 37 चालकांनी बंद केली. सध्या केवळ 38 केंद्रे सुरू आहेत.

ग्रामीण भागातील 37 केंद्रे बंद करण्यात आली, तर अनियमितता आढळल्याने 11 केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला. सुरू असलेल्या केंद्रांवर पुरवठा विभागातील अधिकारी वेळोवेळी भेट देऊन पाहणी करतात.
                                              – सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे

Back to top button