पुण्यात प्लास्टिक बंदी धाब्यावर ! केंद्र सरकारचे आदेश झुगारून जाहिरात फलकांसाठी सर्रास वापर | पुढारी

पुण्यात प्लास्टिक बंदी धाब्यावर ! केंद्र सरकारचे आदेश झुगारून जाहिरात फलकांसाठी सर्रास वापर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  प्लास्टिकवर बंदी असतानाही जाहिरात फलकांसाठी वापरण्यात येत असलेल्या पॉलि विनाइल क्लोराईड (पीव्हीसी) आणि प्लास्टिक पॉलिमरचा बिनधिक्कतपणे वापर सुरू असल्याचे समोर आले आहे. जाहिरात फलकांसाठी वापरल्या जाणार्‍या या प्लास्टिकचा पुनर्वापर होत नाही. त्यामुळे या माध्यमातूनच सर्वाधिक प्रदूषण होत असतानाही सर्व शासकीय यंत्रणांकडून त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केला जात आहे. होर्डिंग कोसळून पाच जणांचा बळी गेल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू केली आहे. आता मात्र, या होर्डिंगवर आणि एकूण जाहिरातीचे जे फलक लावले जातात, त्यावरही बंदी असतानाही सर्रासपणे त्याचा वापर सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, त्यामुळे केवळ होर्डिंगच नाही तर त्यावरील प्लास्टिकचे फलकही बेकायदेशीर ठरत आहेत.

शासकीय कार्यालये अनभिज्ञ
महापालिकेसह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सरसकटपणे या प्लास्टिकच्या जाहिरात फलकाचा वापर सुरू आहे. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग कारवाईबरोबरच या बंदी असलेल्या जाहिरात फलकांवर महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जाहिरात फलकांवर नक्की कसली बंदी?
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी घातक आहे, त्यामुळे केंद्र शासनाने सिंगल युज प्लास्टिकवर 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घातली आहे. देशभर त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, त्यापूर्वी म्हणजेच फेब—ुवारी 2022 मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने जाहिरातीसाठी पॉलि विनाइल क्लोराईड (पीव्हीसी), प्लास्टिक पॉलिमरचे एक नॉन-बायोडिग्रेडेबल मटेरियल वापरले जाते. ते जाळले तर डायऑक्सिन्ससारखे टॉक्सिक धूर सोडते. त्यामुळे त्यावर बंदी घातलेली आहे. असे असतानाही पुण्यासह सर्वच जिल्ह्यांत जाहिरात फलकांसाठी या बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर सुरू आहे.

Back to top button