खेड शिवापूर : कचरा साफ करण्यासाठी गेला अन् जीव गमवला, विजेच्या धक्याने कामगाराचा मृत्यू | पुढारी

खेड शिवापूर : कचरा साफ करण्यासाठी गेला अन् जीव गमवला, विजेच्या धक्याने कामगाराचा मृत्यू

खेड शिवापूर(ता. हवेली), पुढारी वृत्तसेवा : खेड शिवापूर (ता. हवेली) येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या कमरअली दुर्वेश बाबांच्या दर्ग्या शेजारी टाकलेला कचरा साफ करण्यासाठी गेलेल्या कामगाराला विजेचा धक्का बसून आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना २९ एप्रिल ला घडली. वक्फ बोर्डाच्या भोंगळ कारभाराचा हा बळी आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले असून कचरा विघटन करण्यासाठी लवकरात लवकर जागा मिळावी अशी मागणी केली आहे.

अंकुश परशुराम गुंजाळ (वय ६५) असे विजेचा धक्का बसून मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. खेड शिवापूर येथील दर्ग्यावर हजारो भाविक येतात. आलेला प्रत्येक भाविक हा शेरा वहात असतो. शेऱ्यांनी ठराविक उंची गाठली की त्यावरील शेरे काढून शेजारील जागेत टाकले जातात. त्यामुळे त्याठिकाणी घाण पसरली आहे. महत्वाचे म्हणजे घाण टाकल्याने शेजारी असलेल्या विजेच्या खांबाजवळील तार तुटल्याने ही घटना घडली असल्याचे खेड शिवापूरचे सरपंच अमोल कोंडे व माजी सदस्य शाफिकभाई तांबोळी यांनी सांगितले.

अन्यथा आंदोलन : सरपंच कोंडे

याबाबत सरपंच अमोल कोंडे यांना विचारले असता ते म्हणाले की, कचरा विघटन करण्यासाठी केशवभाई सीता ट्रस्ट यांच्या माध्यमातून १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. वक्फ बोर्डाकडे ५२ एकर जमीन उपलब्ध आहे; मात्र एक वर्षापासून वक्फ बोर्डाकडे जागेसाठी पाठपुरावा करीत आहे. त्याकडे वक्फ बोर्डा कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी सुद्धा कचरा त्याठिकाणी टाकू नये, असा पत्रव्यवहार वक्फ बोर्डाकडे केला आहे. भविष्यात याठिकाणी दुर्घटना घडू शकते हे नाकारता येत नाही त्यामुळे वक्फ बोर्डाने लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी. यापुढे अशी दुर्घटना घडल्यास आंदोलन छेडण्यात येईल असे सरपंच अमोल कोंडे यांनी सांगितले.

१५ दिवसात निर्णय घेणार

जागा देण्यासाठीचा प्रस्ताव औरंगाबाद येथे दिला आहे. तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. येत्या पंधरा दिवसात योग्य तो निर्णय घेऊन जागा देण्याचे निश्चित होईल असे वक्फ बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी खुसरो खान यांनी सांगितले.

Back to top button