सॉफ्टवेअर अभियंत्याचा गोळी झाडून मित्रांनीच केला खून | पुढारी

सॉफ्टवेअर अभियंत्याचा गोळी झाडून मित्रांनीच केला खून

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : घरात मृतदेह आढळलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्याचा त्याच्याच मित्रांनी गोळी झाडून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, दोघांनी हा खून कोणत्या कारणातून केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सागर दिलीप बिनावत (वय 33, रा. श्रद्धानगर, कोंढवा) व दत्तात्रय देवीदास हजारे (रा. कोंढवा) या दोघांना अटक केली आहे. गणेश तारळेकर (वय 47, रा. सनफ्लॉवर सोसायटी, कोंढवा) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.

याबाबत पत्नी स्फुर्ती गणेश तारळेकर (वय 42, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचपूर्वी घडली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी विहिरीत फेकून दिलेले पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे.

गेल्या वर्षभरापासून गणेश तारळेकर यांची पत्नी मुलासह वेगळी राहते. मित्रांनी सांगितलेल्या कहाणीनुसार या संगणक अभियंत्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय येत होता. मात्र, दोघा मित्रांकडे सखोल चौकशी केल्यावर आता त्याला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गणेश तारळेकर हे विवाहित असून, त्यांना एक 14 वर्षांचा मुलगा आहे. कौटुंबिक भांडणामुळे त्यांची पत्नी मुलासह एक वर्षापासून जवळच असलेल्या आपल्या वडिलांकडे राहात आहे. याबाबत सुरुवातीला दोघा आरोपींनी सांगितले होते की, गेल्या रविवारी दुपारी तारळेकर यांच्यासोबत ते दोघे घरी होते.

त्यावेळी तारळेकर यांनी पिस्तूल काढून आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. या दोघा मित्रांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी गोळी झाडून घेतली. गोळी त्यांच्या हनुवटीला लागून ते रक्‍ताच्या थारोळ्यात पडले. या प्रकाराने दोघे मित्र घाबरून गेले. ते तारळेकर यांना तसेच घरात टाकून पळून गेले. तेथील पिस्तूल दोघांनी एका विहिरीत टाकून दिले होते.

पोलिसांनी विहिरीत टाकलेले पिस्तूल शोधून काढले असून, तारळेकर यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जर त्यांनी आत्महत्या केली असेल, तर ते दोघेही एकत्र का पळून गेले. या दोघांनी कोणत्या कारणावरून सॉफ्टवेअर अभियंत्याचा खून केला याचा पोलिस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.

दारूच्या पार्टीत घडली घटना

सोमवारी दुपारी हा प्रकार कोंढवा पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घरी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तारळेकर हे रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. मात्र, याबाबत केलेल्या तपासात वेगळीच माहिती पुढे आली. दारू पार्टी करीत असताना या दोघा मित्रांनी संगनमत करून कोणत्या तरी कारणावरून तारळेकर यांच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून त्यांचा खून केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पिस्तूल विहिरीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Back to top button