भाजपच्या दिग्गजांचे राष्ट्रवादीशी सूत जुळणार का ? | पुढारी

भाजपच्या दिग्गजांचे राष्ट्रवादीशी सूत जुळणार का ?

जावेद मुलाणी

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आव्हान देत भाजपच्या गोटात सामील झालेले अप्पासाहेब जगदाळे यांनी पुन्हा राष्ट्रवादीबरोबर घरोबा केल्याने इंदापूर बाजार समितीची निवडणूक तालुक्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरून भाजपमधील अनेक दिग्गज मोहर्‍यांचे राष्ट्रवादीबरोबर सूत जुळणार का, यावर राजकीय चर्चांचे फड रंगू लागले आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अप्पासाहेब जगदाळे यांनी पॅनेलमध्ये उमेदवार निवडीचे सर्वाधिकार हातात घेत एक हाती निवडणूक पार पाडून घवघवीत यश मिळवत पुन्हा बाजार समितीवर सत्ता काबीज केली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी अत्यंत विचारपूर्वक पॅनेलमध्ये उमेदवार निवडले. यामध्ये भाजप व राष्ट्रवादीमध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांचादेखील समावेश करीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना संधी दिल्याने नेत्यांची गोची झाली.

माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनीदेखील अप्पासाहेब जगदाळे यांच्याशी सलगी वाढवून भविष्यातील निवडणुकीतदेखील असेच एकीचे चित्र दिसेल, असे म्हणत जगदाळे यांच्या परतीचे स्वागत केले आहे. भाजपकडून मात्र हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीनंतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर निवडणुकीत उतरलेल्या भाजप कार्यकर्त्यांबाबत काय भूमिका घेणार, याबाबतदेखील त्यांनी अजून स्पष्टता केलेली नाही.

मात्र, निवडणुकीत उतरलेले भाजपचे दिग्गज नेते असल्याने त्यांच्या विरोधात भूमिका घेणे भाजपला परवडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून व अप्पासाहेब जगदाळे यांच्याकडून मात्र या भाजप कार्यकर्त्यांना पायघड्या घातल्या जातील. मात्र, त्यांचे राष्ट्रवादीबरोबर सूत जुळणार का? हे आता पाहावे लागणार आहे.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, निरा-भीमा सहकारी साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यांच्या बिनविरोध निवडणुकीत अप्पासाहेब जगदाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत आपल्या समर्थकांची वर्णी लावली. इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघही आपल्याच कार्यकर्त्यांना संधी देत निवडणूक बिनविरोध करून स्वतःच्या ताब्यात ठेवला.

पुणे जिल्हा बँकेवर बिनविरोध संचालक होऊन आता बाजार समिती निवडणुकीत त्यांनीच अनेकांना संधी दिली. त्यामुळे त्यांना मानणारा तालुक्यात मोठा वर्ग तयार झाल्याने त्यांचा मोठा दबाव गट निर्माण होणार आहे.एकंदरीत बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. भाजपने माघार घेऊन कार्यकर्त्यांना एका निवडणुकीच्या अनुभवापासून वंचित ठेवल्याने याची किंमत त्यांना येणार्‍या काळात मोजावी लागते की काय, हे येणारा काळच उत्तर देईल.

तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष ,धनगर ऐक्य परिषद व इतर स्थानिका आघाड्या यादेखील मोठ्या पक्षांना सोडून स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे या निवडणुकीतून दिसून आले. त्यामुळे येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या पक्षांनी डोके वर काढले, तर नवल वाटायला नको, असे चित्र सध्या दिसत आहे.

मोठ्या नेत्यांचे मनोमिलन हे लोकसभेसाठी

इंदापूर तालुक्यातील राजकारणाने बाजार समिती निवडणुकीत वेगळे वळण घेतले. यामध्ये माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे या दोघांचे मनोमिलन झाले आहे. मात्र, याचे ’कनेक्शन’ बारामती लोकसभा निवडणूक असून, खासदार सुप्रिया सुळे यांना याचा फायदा होईल, याचसाठी हे मनोमिलन राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्याची चर्चा आहे.

जगदाळे ठरले ‘किंग मेकर’

अजित पवार यांचा निरोप आल्याने राष्ट्रवादीने अप्पासाहेब जगदाळे यांच्याशी जुळवून घेतले. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत शांत राहणे पसंत केले आणि अप्पासाहेब जगदाळे यांच्या सर्वपक्षीय पॅनेलच्या खेळीला यश आले. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत अप्पासाहेब जगदाळे किंगमेकर ठरले.

Back to top button