मराठवाड्यातून पुणेमार्गे मुंबई गाठण्यासाठी शिरूर खेड-कर्जत नवा रस्ता | पुढारी

मराठवाड्यातून पुणेमार्गे मुंबई गाठण्यासाठी शिरूर खेड-कर्जत नवा रस्ता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातून पुणेमार्गे मुंबई गाठण्यासाठी महामार्गावरील गर्दी कमी करून अंतर कमी करण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे मराठवाडा तसेच शिरूरमधून येणार्‍या वाहतुकीला मुंबईला जाण्यासाठी नवीन मार्ग मिळणार आहे. यामुळे पुण्यात येणारी वाहतूक शिरूर-खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. परिणामी, वेळेची बचत तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा ताणसुध्दा कमी होणार आहे.

मराठवाडामधून येणार्‍या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव यामार्गे जावे लागते. चाकण आणि शिरूर येथील एमआयडीसीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. मालवाहतूक करणार्‍या वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग उपलब्ध आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला असल्याची माहिती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.

135 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित

शिरूर-पाबळ-राजगुरुनगर-शिरवलीमार्गे पाईट-वांद्रे-कर्जत असा सुमारे 135 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित केला आहे. कर्जतमार्गे पुढे पनवेल-उरणला जोडला जाणार आहे. या मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे. या मार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. भूसंपादन तसेच रस्ते बांधण्यासाठी सुमारे 12 हजार कोटींचा खर्च येणार आहे.

Back to top button